पोलिसाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न - Marathi News 24taas.com

पोलिसाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

www.24taas.com, नाशिक
 
 
नाशिकमध्ये एका ट्रॅफिक पोलिसाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. एका रिक्षावाल्यानं ट्रॅफिक पोलिसाच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केलाय. या प्रकरणी रिक्षावाल्याला अटक करण्यात आलीय.
 
 
वाहतुकीला अडथळा करणारी रिक्षा पुढे नेण्यास सांगण्यावरुन वाहतूक पोलीस व रिक्षाचालकात वाद झाल्याने संतप्त रिक्षाचालकाने स्वत:सह पोलिसावर रॉकेल ओतून पेटवून देण्याची धमकी दिली. याप्रकरणी रिक्षाचालकास अटक करुन त्याच्याविरुद्ध सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
नाशिक मध्यवर्ती बसस्थानकावर सकाळी सव्वा दहा ते साडे दहा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. वाहतुकीला अडथळा ठरणार्‍या रिक्षा हलविण्याचे काम वाहतूक पोलीस प्रभाकर सोनवणे करीत होते. त्याठिकाणी उभ्या असलेल्या रिक्षेला पुढे घ्या म्हणून सांगताच रिक्षाचालक रवींद्र पवार याला राग आला. त्याने सोनवणे यांच्याशी  वाद घातला.
 
 
रवींद्र पवार यांने शिवीगाळ करत रिक्षामधून रॉकेलची कॅन काढून सोनवणे आणि स्वत:च्या अंगावर ओतून जाळण्याची धमकी दिली. त्याठिकाणी उपस्थित असलेल्या अन्य पोलिसांनी प्रसंगावधान राखत पवार यास ताब्यात घेतले.

First Published: Friday, February 10, 2012, 18:18


comments powered by Disqus