नगरमध्ये बिबट्या मादी जेरबंद - Marathi News 24taas.com

नगरमध्ये बिबट्या मादी जेरबंद

www.24taas.com, अहमदनगर
 
 
संगमनेर तालुक्यातल्या रायतेवाडी शिवारात वनविभागाने लावलेल्या पिंज-यात बिबट्या मादी जेरबंद झाली. या मादीला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने तिच्याच बछड्यांचा उपयोग केला आणि बछड्यांच्या ममत्वापोटी ती मादी अलगद पिंज-यात अडकली गेली. मात्र, असं असलं तरी मातेपासून दुरावलेल्या या बछड्यांना पुन्हा मायेची उब मिळाल्यानं ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.
 
 
पंधरा दिवसांपूर्वी जन्मलेले दोन बछडे ऊस तोडणी मजुरांना आढळले होते. या बछड्यांना पाहण्यासाठी परिसरातल्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. बछडे मिळाले नाहीत, तर मादी त्रास देईल, अशीही भीती गावक-यांना वाटत होती. त्यामुळं बछड्यांनाच पिंज-यात ठेवण्याची युक्ती लढवण्यात आली. आणि झालंही तसंच, बछड्यांच्या शोधार्थ फिरताना रात्री मादीनं आपल्या पिलांना पाहिलं आणि ती अलगद पिंज-यात अडकली.
 
 
 चंद्रपूर -  रानगव्यांना मिळाले जीवदान
दरम्यान,  चंद्रपूर शहरालगतच्या पद्मापूर गावात विहीरीत पडलेल्या रानगव्यांना बाहेर काढण्यात वन विभागाला यश आलंय. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाशेजारी हे पद्मापूर गाव आहे. त्यामुळे इथं वन्यजीवांचा वावर असतो. शेतातल्या विहीरीला कठडे नसल्यानं दोन रानगवे पडले. रात्रभर ते १० फूट खोल विहीरत अडकून पडले होते. वनविभागाचे अधिकारी येईपर्यंत गावक-यांनी त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले पण त्यात त्यांना यश आलं नाही. अखेर ३६ तासांनंतर वनविभागानं जेसीबीच्या मदतीने या दोन रानगव्यांना बाहेर काढलं.
 
व्हिडिओ पाहा..
बिबट्यामादी पिंजऱ्यात कैद

First Published: Saturday, March 10, 2012, 19:37


comments powered by Disqus