Last Updated: Tuesday, January 22, 2013, 18:16
www.24taas.com, मुंबईनाट्य परिषदेच्या अध्यक्षपदावरून वाद सुरू झाले आहेत. माजी अध्यक्ष मोहन जोशी यांनी विनय आपटेंवर गंभीर आरोप केले आहेत. विनय आपटेंनी बोगस मतपत्रिका छापल्याचा आरोप मोहन जोशींनी केला आहे.
विनय आपटे यांनी नाशिकमध्ये मतपत्रिका छापून त्या पाकिटबंद केल्याचा आरोप माजी अध्यक्ष मोहन जोशी यांनी केला आहे. हे वर्तन नियमबाह्य असल्याचं मोहन जोशींचं म्हणणं आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नियमानुसार मतपत्रिका मुंबईतच छापल्या जायला हव्या आणि मुंबईतच पाकिटबंद केल्या जाव्यात.
विनय आपटेंवर मोहन जोशींनी केलेल्या आरोपांवर विनय आपटेंनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र मराठी नाट्यसृष्टीतील दोन दिग्गज अभिनेत्यांमध्ये अध्यक्षपदावरून असे वाद व्हावेत, हे मराठी नाट्यसृष्टीसाठी निश्चितच वाईट आहे, असे नाट्यप्रेमींचे म्हणणे आहे.
First Published: Tuesday, January 22, 2013, 18:16