कथा एका धैर्याची... कथा एका जिद्दीची!, navin anchal : handicapped swimmer from mumbai

कथा एका धैर्याची... कथा एका जिद्दीची!

कथा एका धैर्याची... कथा एका जिद्दीची!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

आयुष्यात सगळ काही सुरळीत सुरु असतानाही अनेक जण नेहमीच तक्रारीचा सूर आळवताना आपण आजूबाजूला पाहत असतो. मात्र, दोन्हीही पाय गमावले असतानाही आयुष्य किती मौल्यवान आहे आणि नियतीवरही कशी मात करता येते हे नवीन अंचल यांनी दाखवून दिलंय.

कुणालाही दोष न देता नियतीवरही विजय कसा मिळवता येतो, हे दाखवून दिलंय नवीन अंचल यांनी... नवीन अंचल यांचं आयुष्य वयाच्या २६ व्या वर्षांपर्यंत एका सामान्य धडधाकट माणसाप्रमाणे सुरु होतं. मात्र, अचानक नियतिने त्यांच्यावर झडप घातली. वयाच्या २६ व्या वर्षी एका अपघातामध्ये नवीन यांना आपले दोन्हीही पाय गमावावे लागले. तरीही, हार न पत्करता नवीन अंचल यांनी नव्याने आयुष्याला सुरुवात केली आणि आज ते एक उत्तम स्विमर आहेत.

नुकत्याच मालवणमध्ये पार पडलेल्या `सी टूर्नामेंट`मध्ये दोन किलोमीटर अंतर पार केलेल्या नवीन अंचल यांनी मुंबईत झालेल्या स्विमथॉनमध्येही दोन किलोमीटर अंतर अरबी समुद्रात पोहून पार केलं. एव्हढंच नव्हे तर आणखीही काही टूर्नामेंटमध्ये त्यांनी मेडल्सची कमाई केलीय.

राज्य स्तरावर मेडल्स पटकावणाऱ्या नवीन यांची नॅशनल लेव्हलवर मेडल्स जिंकण्याची आणि इंटनरनॅशनल स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची महत्त्वाकांक्षा आहे आणि त्यादृष्टीने ते मेहनतही घेत आहेत. मुलुंड इथं राहणारे नवीन हे सध्या मुलुंडमधील कालिदास स्कूलमधील स्विमींग पूलमध्ये प्रॅक्टीस करतात. ४५ वय असलेले नवीन हे ‘टूर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स’चा व्यवसाय करत असून आयुष्यात कितीही मोठं संकट आल तरी हार मानायची नाही, असं त्यांच्या आयुष्याचं तत्त्व आहे.

नवीन अंचल यांच्या या सकारात्मक दृष्टीमुळेच त्यांनी आपल्या अपंगत्वावर मात केलीय. यामुळेच ते केवळ अपंगांसाठीच नव्हे तर तुमच्या-आमच्यासारख्या सामान्य नागरिकांनाही एक प्रकारची आयुष्यात लढण्याची आणि जिंकण्याची प्रेरणा निर्माण करतात.



व्हिडिओ पाहा -




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, January 8, 2014, 15:08


comments powered by Disqus