Last Updated: Thursday, April 19, 2012, 17:05
www.24taas.com, नवी दिल्ली भारताची स्टार सायना नेहवालने आशिया स्पर्धेत पहिल्या लढतीत बाजी मारली आहे. चीनमधील क्विंगडाओत सुरू असलेल्या आशिया बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत (एबीसी) पाचवी मानांकित सायनाने विजयी सलामी दिली.
सायनाने जपानच्या काओरी इमाबेप्पूचा २१-९ , २१-१२ असा पराभव केला. मात्र, सायनाने चांगली सुरुवात केली असली तरी ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा या भारताच्या युवा जोडीला सलामीतच पराभवाचा धक्का बसला. मात्र प्रज्ञा गद्रे आणि प्राजक्ता सावंतने महिला दुहेरीत विजयी सलामी दिली आहे. पुरुष एकेरीत भारताच्या अजय जयरामचे आव्हान दुस-या फेरीत संपुष्टात आले. मात्र साई प्रनीत बीने आगेकूच करताना हॉँगकॉँगच्या ११ व्या मानांकित विंगकी वॉँगवर २१-१९, २१-१६ असा विजय मिळवला. त्यामुळे आशिया स्पर्धेत भारताला पदकाची आशा निर्माण झाली आहे.
मिश्र दुहेरीत वी. दिजू आणि ज्वाला गुट्टा या १६व्या मानांकित भारताच्या जोडीने विजयी सलामी दिली आहे. मात्र, रुपेश कुमार आणि सानवे थॉमससह प्रणव चोप्रा-अक्षय देवलकर आणि तरुन कोना-अरुण विष्णू जोडीला पुरुष दुहेरीच्या सलामीलाच पराभवाचा धक्का बसला. सायनाने चांगली सुरूवात केली असल्याने ती अंतिम फेरीत पोहण्याची आशा निर्माण झाली आहे.
First Published: Thursday, April 19, 2012, 17:05