'विम्बल्डन'वर कोण गाजवणार सत्ता?, Who is the Wimbledon king

'विम्बल्डन'वर कोण गाजवणार सत्ता?

'विम्बल्डन'वर कोण गाजवणार सत्ता?
www.24taas.com, झी मीडिया, विम्बल्डन

लाल मातीच्या लढाईनंतर आता विम्बल्डनच्या ग्रास कोर्टवर सीडेड टेनिसपटूंमध्ये मुकाबला रंगणार आहे. रॉजर फेडरर, राफाएल नादाल, नोवाक जोकोविच आणि अँडी मरे या चौघांमध्ये मेन्स सिंगल्समध्ये लढत पाहायला मिळेल. तर वुमेन्स सिंगल्समध्ये सेरेना विल्यम्स आणि मारिया शारापोव्हाबरोबर व्हिक्टोरिया अझारेन्का अजिंक्यपदासाठी प्रमुख दावेदार असेल.

विम्बल्डनचं सेंटर कोर्ट... या टेनिस कोर्टवर काहींची स्वप्न साकार होतात. तर काहींची स्वप्न ही स्वप्नच राहतात. या ऐतिहासिक सेंटर कोर्टनं अनेक चॅम्पियन टेनिसपटू टेनिस जगताला दिले. आता सीझनमधील तिसरं ग्रँडस्लॅम अर्थातच विम्बल्डनसाठी दिग्गज टेनिसपटूंमध्ये युद्ध रंगेल. मेन्स सिंगल्समध्ये डिफेन्डिंग चॅम्पियन रॉजर फेडररसमोर आपलं टायटल डिफेन्ड करण्याचं आव्हान असेल. गेल्या सीझनमध्ये विम्बल्डन जिंकल्यानंतर त्याला अजून एकही ग्रँडस्लॅम पटकावता आलं नाही. त्यामुळे त्याला विक्रमी १८ वं ग्रँडस्लॅम जिंकण्यासाठी नादाल, जोकोविच आणि मरेचं आव्हान मोडित काढावा लागले. ग्रास कोर्टचा अनभिषिक्त सम्राट अशी त्याची ओळख आहे. आता फेडरर आपली बिरुदावली कायम राखतो का? याकडे त्याच्या चाहत्यांच लक्ष असेल.

लाल मातीचा बेताज बादशहा अर्थातच राफाएल नादाल विक्रमी आठव्यांदा फ्रेंच ओपन पटकावल्यानंतर विम्बल्डनवर तिसऱ्यांदा नाव कोरण्यास आतूर असेल. तर सर्बियन जोकर म्हणजेच नोवाक जोकोविचही विजयासाठी प्रबळ दावेदार मानण्यात येतोय. त्याचा स्टॅमिना जबरदस्त आहे. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांना त्याच्यापासून सावध रहावं लागेल.

ब्रिटनच्या अँडी मरेला गेल्या सीझनमध्ये विम्बल्डननं हुलकावणी दिली होती. त्यामुळे आपलं विम्बल्डन जिंकण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तोही आतूर असेल. वुमेन्स सिंगल्समध्ये अमेरिकन टेनिसस्टार सेरेना विल्यम्स विजयासाठी हॉट फेव्हरेट असेल. तिला रशियन ब्युटी मारिया शारापोव्हाकडून कडवी टक्कर मिळणार आहे. तर भारताला डबल्समध्ये मोठ्या अपेक्षा असणार आहेत. मात्र, खरी चुरस रंगेल ती मेन्स सिंगल्सच्या मुकाबल्यामध्ये. आता ग्रास कोर्टचा किंग कोण ठरतो? याकडेच टेनिस चाहत्यांचं लक्ष असेल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, June 24, 2013, 08:45


comments powered by Disqus