महापालिकेची उमेदवारी, घरच्या घरी ! - Marathi News 24taas.com

महापालिकेची उमेदवारी, घरच्या घरी !

नितीन पाटोळे, www.24taas.com, पुणे
 
पुण्यात विधानसभेच्या आठ पैकी सात तर विधानपरिषदेच्या एका आमदाराने महापालिकेसाठी घरातल्या व्यक्तींसाठी उमेदवारी मागितलेली आहे. अनिल भोसले हे राष्ट्रवादीचे विधान परिषदेतले आमदार आहेत.
 
भोसले आमदार असून विद्यमान नगरसेवक आहेत. यावेळी त्यांनी पत्नीसाठी पक्षाकडं तिकीट मागितलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारे यांनी मुलगा रवींद्र आणि पुतण्या महेंद्र यांच्यासाठी पक्षाकडं तिकीट मागितलं आहे. काँग्रेसचे आमदार विनायक निम्हण यांचा मुलगा आणि शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सनी निम्हणही उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. काँग्रेसचे दुसरे आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचा मुलगा अविनाश बागवे हेही दुसऱ्यांदा नगरसेवक बनण्यास इच्छुक आहेत. शिवसेनेचे आमदार आणि विद्यमान नगरसेवक महादेव बाबर यांच्या घरातूनही उमेदवारीसाठी दोघे इच्छुक आहेत. त्यांनी मुलगा महेश आणि सून मेघा यांच्यासाठी उमेदवारी मागितली आहे. मेघा बाबर या विद्यमान नगरसेविका आहेत.
 
 
शिवसेनेचे दुसरे आमदार चंद्रकांत मोकाटे हे विद्यमान नगरसेवक असून त्यांनी उपमहापौरपदही भूषवलं आहे. त्यांनी आता कोथरुडमधून पुतण्या योगेश यांच्यासाठी पक्षाकडं तिकीट मागितलंय. ‘पार्टी विथ डिफरन्स’ अशी ओळख सांगणाऱ्या  भाजपमध्येही वेगळी स्थिती नाही. खडकवासला पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला आस्मान दाखवणाऱ्या भीमराव तापकीर यांनाही भाऊ किंवा पुतण्यासाठी तिकीट मागितलं आहे. तर भाजपच्या दुसऱ्या आमदार माधुरी मिसाळ यांनीही मुलगी पूजा हिच्यासाठी फिल्डिंग लावली आहे.
 
भाजपाचे आमदार गिरीष बापट हे शहरातले एकमेव असे आमदार आहेत ज्यांनी घरातल्या व्यक्तीसाठी तिकीट मागितलेलं नाही. आमदारांचा सत्तेसाठीचा हव्यास पुणेकरांना पसंत पडलेला नाही. आमदार होऊनही नगरसेवक पदात एवढा रस का आहे याचं उत्तर दडलं आहे महापालिकेच्या अर्थकारणात. पुणे महापालिकेच्या प्रत्येक नगरसेवकाला दरवर्षी २० लाख रुपये स्थानिक विकासनिधी मिळतो. बजेटमधून प्रत्येक नगरसेवकाला सुमारे ७० ते ८० लाख रुपयांचा निधी मिळतो. या आकडेवारीमुळेच आमदार झाल्यावरही पालिका सभागृहाचा मोह आमदरांना सुटत नसावा.
 
 

First Published: Wednesday, January 25, 2012, 22:52


comments powered by Disqus