सहा हजार पोलीस मतदानापासून वंचित ! - Marathi News 24taas.com

सहा हजार पोलीस मतदानापासून वंचित !

नितीन पाटेळे, www.24taas.com, पुणे
 
पुण्यात पोलीस प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे पोलिसांवर मतदानापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. योग्य ती कागदपत्र न पुरवल्यानं  पोलिसांना पोस्टल मतदानासाठी अर्जच करता आले नाहीत. त्यामुळं सुमारे सहा हजार पोलीस मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
 
मतदाराचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोग वेगवेगळ्या प्रकारे जनजागृतीचं काम करतं. मात्र पोलिसांपर्यंत ही जनजागृती पोहचल्याचं दिसत नाही. मतदानाच्या दिवशी अन्य ठिकाणी ड्यूटीवर असलेल्या पोलिसांना पोस्टल मतदान करावं लागतं. मात्र त्या पोस्टल मतदानासाठी अर्ज करण्याची मुदत १० तारखेलाच संपली. पुणे पोलिसांनी त्यासाठी अर्जच केले नाहीत. कारण पोलीस आयुक्तालयातून त्यांना इलेक्शन ड्यूटी सर्टीफिकेटच मिळाली नाहीत.
 
पोस्टल मतदानासाठीचा अर्ज करण्याची मुदत संपल्यानं आता पोलिसांना पोस्टल मतदान करण्यासाठी वॉर्ड अधिकाऱ्याच्या मेहरबानीवरच अवलंबून राहावं लागणार आहे. शहर पोलिसांची ही गत तर एस.आर. पी जवानांची वेगळीच तऱ्हा. त्यांनी वेळेत अर्ज केले खरे, पण त्यांच्या अर्जावर वरिष्ठांच्या सह्याच नाहीत. त्यामुळे आता पोलीस आणि एसआरपी जवान मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
 
 

First Published: Tuesday, February 14, 2012, 10:47


comments powered by Disqus