कोण ठरतयं अजितदांदाची डोकेदुखी? - Marathi News 24taas.com

कोण ठरतयं अजितदांदाची डोकेदुखी?

www.24taas.com, पिंपरी चिंचवड
 
पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं महापालिकेत २/३ बहुमत मिळवलं असलं तरी आता महापौरपदासाठी रस्सीखेच सुरू झाल्यानं अजितदादांसमोर नवीन डोकेदुखी निर्माण झाली आहे. महापौरपद अडीच वर्षांसाठी मिळावं अशी मागणी जोर धरू लागल्यानं दादा चांगलेच अडचणीत आले आहेत.
 
पिंपरी-चिंचवडमध्ये महापौरपदी कोण विराजमान होणार हे नक्की नसलं तरी आमदार विलास लांडे यांच्या पत्नी मोहिनी लांडे यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जातं आहे. मात्र आमदार विलास लांडे आणि इतर इच्छुकांनी अजितदादांसमोर एक वेगळीच डोकेदुखी निर्माण केली आहे. महापौर योगेश बहल यांचा सव्वा वर्षांचा कार्यकाळ वाढवून जसा अडीच वर्षांचा केला तेवढाच कार्यकाळ आपल्या पत्नीला मिळावा यासाठी विलास लांडे आग्रही आहेत.
 
इतर इच्छुकांचीही हीच मागणी आहे. तर याबाबत जो निर्णय होईल तो सर्वांनी मान्य करावा असा दम अजितदादांनी विजयी मेळाव्यात दिला आहे. पिंपरी चिंचवड अजित पवारांचा बालेकिल्ला आहे. मात्र या भागातले आमदार विलास लांडे, लक्ष्मण जगताप, आझम पानसरे यांच्या दबदब्यामुळेच दादांचा बोलबाला आहे. त्यामुळे त्यांचं म्हणणं टाळणंही त्यांच्यासाठी त्रासदायक ठरेल.
 
 

First Published: Saturday, February 25, 2012, 17:50


comments powered by Disqus