Last Updated: Thursday, December 12, 2013, 19:42
www.24taas.com, झी मीडिया, राळेगणसिद्धी अण्णा हजारे यांनी जनलोकपालच्या मागणीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस... आज अरविंद केजरीवाल हे अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी उपस्थित राहणार होते. मात्र, तब्येतीच्या कारणास्तव त्यांनी त्यांचा हा बेत रद्द केला. पण, ‘आप’चे नेते कुमार विश्वास मात्र राळेगणसिद्धीमध्ये उपस्थित झाले. इथं मात्र त्यांचा ‘नवीन टीम अण्णा’नं अपमान केल्यानं ते नाराज झालेत.
जनलोकपालसाठी उपोषणाला बसलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पाठिंबा देण्यासाठी राळेगणसिद्धीमध्ये दाखल झालेल्या आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास यांना एका कार्यकर्त्याने धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. कुमार विश्वास, संजय सिंग यांच्यासह आम आदमी पक्षाचे अन्य काही नेते गुरुवारी सकाळी राळेगणमध्ये दाखल झाले. ते गावात प्रवेश करताच एका युवकाने आम आदमी पक्ष मुर्दाबाद, अण्णा हजारे झिंदाबादच्या घोषणा देत कुमार विश्वास यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला.
‘आम आदमी पक्षा’च्या काही कार्यकर्त्यांनी आणि ग्रामस्थांनी त्या युवकाला बाजूला केले. नितीन चव्हाण असे या युवकाचे नाव असून, तो मुंबईतील राहणार आहे. युवकाला बाजूला करण्यासाठी काही जणांना त्याच्यावर हातही उगारला. त्यावेळी ‘आम आदमी पक्ष’ हिंसेचे समर्थन करतो का? असा प्रश्नही चव्हाण यांनी उपस्थित केला.
दरम्यान, कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने आपल्या व्यासपीठावर येऊ नये, असे अण्णा हजारे यांनी स्पष्ट केल्यामुळे कुमार विश्वास आणि संजय सिंग हे अण्णांच्या व्यासपीठासमोरील प्रेक्षकांच्या जागेत जाऊन बसले.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, December 12, 2013, 19:42