Last Updated: Sunday, April 14, 2013, 14:18
www.24taas.com, सातारा वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत आलेले उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कराडमध्ये गांधीगिरी सुरु केलीय. यावर शेतकरी संघटनेनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी हल्लाबोल चढविला. ही अजित पवार यांची नौटंकी आहे, अशी टीका शेट्टी यांनी केली.
अजित पवारांनी सावलीत बसून आंदोलन करू नये. त्यांना जर खरंच असे काहीतरी वाटत असेल तर त्यांनी ऊन्हात बसून दाखवावे. लोकांना काय चटके बसलेत ते समजून येतील. केवळ सहानभुती मिळविण्यासाठी प्रतत्न करू नये. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा त्यांची खिल्ली उडविणे चुकीचे आहे. ते जे वागले ते बरोबर नाही. त्यांचे आत्मक्लेश हे नौटंकीचे प्रकरण आहे, असे शेट्टी म्हणालेत.
सामाजिक जीवनात जे काही घडलं त्याचं प्रायश्चित घेण्यासाठी आपण येथे आलोय. जो काम करतो तो चुकतो. त्यामुळे आपल्या चुकीबद्दल प्रायश्चित घेण्याचे ठरविलेय. मला जे वाटले ते मी करण्यासाठी येथे आलोय. मला काही प्रसिद्धी मिळवायची नाही. नाहीतर मी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले असते. तसे मी केलेले नाही. आपल्या राजकीय जीवनात असं काहीतरी करावसं वाटलं म्हणून मी कराडमध्ये आलोय. मला वाटलं, म्हणून मी हे करीत आहे, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली. आता करून काय उपयोग, असा सवाल राज यांनी उपस्थित केलाय. राज ठाकरेंनी अजितदादांच्या गांधीगिरीची खिल्ली उडवलीय. जो बुंदसे गयी वो हौद से नही आती असा टोला राज यांनी अजितदादांना लगावलाय. त्यांचे वक्तव्य पुढचे ५०वर्ष महाराष्ट्रातील जनता विसरणार नाही. त्यांनी प्रायश्चित घेण्यापेक्षा दुष्काळग्रस्तांना पाण्याची व्यवस्था करावी असं राज यांनी सांगितलं.
यशवंतराव यांच्या पायाशी बसून अजित पवारांना सुबुद्धा सुचेल अशी अपेक्षा गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केलीये. अजित पवार यांची वृत्ती आणि प्रवृत्ती उर्मट पणाची आहे. त्यांच्या वागण्या बोलण्यामुळे शरद पवारांना तीन वेळा माफी मागावी ल्यागल्याचं त्यांनी सांगितलं. अजित पवार हे हुकुमशहा असल्यासारखे वागतात.
First Published: Sunday, April 14, 2013, 14:01