Last Updated: Wednesday, April 30, 2014, 19:11
www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर सरकारने जादूटोणाविरोधी विधेयक संमत करून कायदा केला. पण या कायद्याचा खरच उपयोग झालाय का? असा प्रश्न पडलाय. समाजात आजही अनेक भोंदूबाबा बिनबोभाटपणे अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहेत. स्त्री गर्भाचं पुरूष गर्भात रूपांतर करून देतो असं सांगून लुबाडणाऱ्या शंकर कुंभार या भोंदूबाबाला रंगेहात पकडण्यात आलंय.
कोल्हापूर शहरातल्या साळोखेनगर परिसरातला भोंदूबाबा शंकर दत्तात्रय कुंभार पोलिसांच्या जाळ्यात अडकला गेलाय. पण, गेली कित्येक वर्ष तो स्त्री गर्भाचं पुरूष गर्भात रुपांतर करून देण्याच्या भूलथापा देत सात गोळ्या द्यायचा आणि एक हजार एक्कावन्न रुपये घेऊन गरजुंना लुबाडायचा. पकडला गेल्यावरही त्याचा हा दावा कायम आहे.
अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे सदस्य सतीशचंद्र कांबळे यांनी पोलिसांच्या मदतीनं या बाबाची पोलखोल केलीय. मात्र, आपल्या उपचाराचे साईड इफेक्ट्स नाहीत. त्यामुळे आपल्या उपचारांपासून अपाय काही नाही, असं हा भोंदूबाबा म्हणत आहे. राजवाडा पोलिसांनी या बाबाला अटक केल्यावर त्याच्या घराच्या झडतीतून जडीबुटी आणि वेगवेगळी औषधं मिळाली आहेत, अशी माहिती एपीआय अमित म्हस्के यांनी दिलीय.
भोंदूबाबाच्या घरातून बेळगाव, निपाणी, पुणे, सातारा, कराड या शहरातलेही पत्ते मिळालेत. त्यामुळे याची करामत कुठपर्यंत पोहोचली होती याची कल्पना येते. १९८२ सालापासून लुबाडणाऱ्या या भोंदूबाबाला पकडायला एवढा उशीर का झाला? असा प्रश्न निर्माण होतोय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. •
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, April 30, 2014, 17:19