Last Updated: Thursday, April 11, 2013, 16:46
www.24taas.com, सातारा शाहरुखचा आगामी सिनेमाचं... ‘चेन्नई एक्सप्रेस’चं शुटींग सध्या सातारा जिल्ह्यातील वाईजवळच्या मुगांव या एका छोट्या भागात सुरू आहे. या शुटींगसाठी भला मोठा सेटही उभारण्यात आलाय. पण, यामुळे सातारकर मात्र धास्तावलेत!
होय, सातारकरही धास्तावलेत. कारण, महाराष्ट्रातील इतर ठिकाणांप्रमाणेच इथंही नागरिक दुष्काळाच्या उन्हातून प्रवास करत आहेत आणि अशा परिस्थितीतच शाहरुख खानच्या सिनेमाच्या सेटवर उभारण्यात आलेल्या बगिच्यातील हिरवळ कायम राखण्यासाठी जवळच्याच धोम धरणातून इथं हजारो लिटर पाणी दररोज पुरवलं जातंय. विशेष म्हणजे राज्यातील दुष्काळाची परिस्थिती पाहता सर्व धरणांतील पाणी फक्त पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिले गेले असताना इथं मात्र शुटिंगसाठी वापरलं जात असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलंय. चित्रपट निर्माती कंपनी ‘रेड चिली एन्टटेन्मेंट’ आपल्याकडे या शूटींगची परवानगी असल्याचं सांगतेय. शिवाय पाण्याच्या वापराविषयी कंपनीने आगाऊ शुल्क भरले होते.
जलसंपदा विभागाच्या या पाण्याच्या उधळपट्टीच्या निर्णयामुळे स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होतोय. याबद्दल स्थानिकांनी जलसंपदा विभागाच्या अभियंत्याकडे तक्रार दाखल केलीय. पण आश्वासनाशिवाय त्यांच्या हाती काहीच लागलं नाही.
First Published: Thursday, April 11, 2013, 16:46