पिंपरी-चिंचवडमध्ये माणुसकीचा मृत्यू Death of Humanity in Pimpri-Chinchwad

पिंपरी-चिंचवडमध्ये माणुसकीचा मृत्यू

पिंपरी-चिंचवडमध्ये माणुसकीचा मृत्यू
www.24taas.com, पिंपरी-चिंचवड

पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा सुरक्षेचे धिंडवडे काढणारी आणि मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. चाकणमध्ये रिक्षा चालकाचा उदामपणा माणुसकीला घातक ठरला आहे. त्यावर कडी म्हणून मदत करणाऱ्यांने थेट पैशाचीच मागणी केली.

चाकणमध्ये एका कंपनीत काम करणारा अप्पासाहेब मकदूम हा २६ वर्षीय तरूण रिक्षाचालकाच्या बेजबाबदार पणामुळे चिंचवडच्या आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.

शनिवारी रात्री अप्पासाहेब याचा ड्रायव्हर बाळू गवारीसह कंपनीच्या एका अधिकाऱ्याला एअरपोर्टवरून आणण्यासाठी निघाला होता. त्याचवेळी एका रिक्षानं त्यांच्या गाडीला मागून धडक दिली. त्यानंतर रिक्षाचालक आणि प्रवाशांची कारच्या ड्रायव्हरशी बचाबाची झाली. चिडलेल्या रिक्षाचालकानं पुन्हा रिक्षा कारला आडवी घातली. आणि अप्पासाहेब आणि ड्रायव्हरवर चाकूनं हल्ला केला.

जखमी ड्रायव्हरनं हॉस्पिटल गाठलं मात्र अप्पासाहेब रस्त्यावरच पडून होता. त्यानं बाईकस्वाराकडे मदत मागितली मात्र हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी बाईकस्वारानं तीन हजार रुपयांची मागणी केली. एवढ्यावरच त्याचं समाधान झालं नाही. त्यानं हॉस्पिटलमध्ये अप्पासाहेबाला दाखल केल्यानंतर पैसे मिळत नसल्याचं पाहून दोन मोबाईल लंपास केले. सध्या अप्पासाहेब आणि बाळूची प्रकृती स्थिर आहे.

या घटनेनं पिंपरी चिंचवडमधल्या कायदा सुव्यवस्थेची लक्तरं पुन्हा एकदा वेशीला टांगली गेलीएत. मात्र एवढं होवूनही पोलीस उपायुक्त गप्पच आहेत. बदलत्या मानवतेचं हे विदारक चित्र पिंपरी चिंचवडमध्ये समोर आल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होतेय.

First Published: Sunday, December 23, 2012, 21:55


comments powered by Disqus