Last Updated: Thursday, December 26, 2013, 09:34
www.24taas.com, झी मीडिया, पुणेपुण्यामध्ये सध्या एकट्या दुकट्यानं रस्त्यावर चालणं धोक्याचं झालंय. पुण्यातली चाळीस हजारी टोळी रस्त्यावर गाठते आणि हल्ले करते. या टोळीनं पुणेकरांची झोप उडवलीय.
पुण्यातल्या रस्त्यांवर कुणाचं साम्राज्य आहे ?
शहरामध्ये कुणाची आहे प्रचंड दहशत ?
कुणी उडवलीय पुणेकरांची झोप ?
या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे कुत्रे. कधी एकटे - दुकटे तर कधी भली मोठी टोळी. पुण्यातल्या रस्त्यांवर तुम्हाला गाठतेच. बर नुसतं शेपटी हलवत बाजूनं ही टोळी निघून गेली तर हरकत नाही पण ती चक्क पुणेकरांवर हल्ला करुन चावा घेतायत.
या संपूर्ण वर्षातल्या आकडेवारीवर नजर टाकली तर कुत्र्यांचा हैदोस लक्षात येईल. जानेवारी २०१३ पासून आजतागायत शहरात बारा हजार ३१९ नागरिकांना कुत्रे चावलेत. याचाच अर्थ महिन्याला किमान एक हजार जणांना कुत्रा चावतो. म्हणजेच दिवसाकाठी किमान ३० ते ३५ जणांचे लचके तोडण्याचं पुण्यातली भटकी कुत्री करतायत.
आज घडीला पुणे शहरात कुत्र्यांची संख्या किमान ४० हजार आहे. या कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी करण्याचं तसेच त्यांना रेबीज प्रतिबंधक लस देण्याचं काम महापालिकेकडून केलं जातं. भटक्या कुत्र्यांना मारता येत नसल्यानं त्यांना पकडून सोडून देणं याशिवाय दुसरा पर्याय नाही.
मात्र महापालिकेला त्यातही फारसं यश आलेलं नाही. महिन्याकाठी सुमारे ५०० याप्रमाणे वर्षभरात केवळ ५ ते ६ हजार कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करून सोडून देण्यात आलयं. अशा सगळ्या परिस्थितीत भटक्या कुत्र्यांना आवर घालता येत नसला तरी कुत्रा चावल्यावर तात्काळ उपचार घेणं तेवढंच काय ते सर्वसामान्यांच्या हातात आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, December 26, 2013, 09:34