... हा आहे दाभोलकरांच्या हत्येतील दुसरा आरोपी!, dr. dabholkar murder : sketch of second accused

... हा आहे दाभोलकरांच्या हत्येतील दुसरा आरोपी!

... हा आहे दाभोलकरांच्या हत्येतील दुसरा आरोपी!
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला उद्या मंगळवारी दोन आठवडे पूर्ण होत आहेत. पण, अजूनही पुणे पोलिसांना ना या हत्येमागच्या कारणांचा उलगडा झालाय ना मारेकऱ्यांचा...

दरम्यान, डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येत सामील असणाऱ्या आणखी एका संशयिताचं छायाचित्र पोलिसांनी प्रसिद्ध केलंय. दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना पळून जाताना पाहणाऱ्या आणखी दोन साक्षीदार पोलिसांना सापडले होते. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे हे रेखाचित्र रेखाटण्यात आलंय. त्यामुळे आता तरी पोलिसांच्या हाती काहीतरी भक्कम माहिती लागेल, अशी शक्यता आहे.

यापूर्वी पोलिसांनी पहिल्या मारेकऱ्याचं रेखाचित्रही प्रसिद्ध केलं होतं. दाभोलकरांवर गोळ्या झाडताना या मारेकऱ्यांना पाहणारा एक प्रत्यक्षदर्शी पोलिसांच्या हाती लागला होता. त्यानं दिलेल्या माहितीवरून हे छायाचित्र रेखाटण्यात आलं होतं. पण, पोलिसांना या छायाचित्राच्या आधारे मारेकऱ्यांपर्यंत पोहचण्यात अजून तरी यश आलेलं नाही.

दरम्यान, जंगली महाराज रोड, शनिवार पेठ परिसरातील वेगवेगळ्या सात ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांमध्ये दाभोलकरांचे मारेकरी निष्पन्न झाले आहेत. घटनेच्या दिवशी सकाळी साडे सातच्या दरम्यान शिंदे पाराकडून आलेल्या मारेकऱ्यांना जंगली महाराज रोड, शनिवार पेठ परिसरातील सात `सीसीटीव्ही` कॅमेऱ्यांनी टिपले आहेत. पोलिसांकडून अजूनही काही कॅमेऱ्यांचे `सीसीटीव्ही` फुटेज तपासण्यात येत असून आरोपींच्या `इमेज’ मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. आरोपींनी दाभोलकरांची रेकी केली असावी, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, September 2, 2013, 17:55


comments powered by Disqus