Last Updated: Thursday, August 15, 2013, 16:10
www.24taas.com , झी मीडिया, सांगली गेल्या ६६ वर्षात सांगली जिल्ह्यातील १५७ जवानांनी भारताच्या रक्षणासाठी प्राणांचं बलिदान दिलं. यापैकी एका शहीद जवानाच्या माता-पित्यांवर उतारवयात उपासमारीची वेळ आलीय.
ज्यानं आपल्या प्राणाची पर्वा न करता हसत हसत मृत्यूला कवेत घेतलं. त्या शहीद संजय शिनगारे यांच्या घरावर आता उपासमारीची वेळ आलीय. सांगलीच्या मिरजमधल्या सिद्धेवाडी गावाचा वीरपुत्र असलेल्या संजय शिनगारे यांना २४ मार्च २००४साली त्रिपुरा इथल्या नक्षली हल्ल्यात वीरमरण आलं. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, तीन मुलं आणि आई-वडील असा परिवार होता.
शिनगारे यांच्या पत्नी जयश्रीच्या नावं २१ लाख रुपये मिळाले. मात्र जयश्री यांच्या आजारपणावर सारे पैसे खर्च झाले. दुर्दैवानं उपचाराला साथ मिळाल्यानं जयश्री यांचा मृत्यू झाला आणि शहीद संजय शिनगारे यांच्या मुलांची जबाबदारी त्यांच्या वृद्ध आईवडीलांवर आली. या तिघांच्या पालनपोषणासाठी म्हातारपणात त्यांना शेतात जाऊन मजुरी करण्याची वेळ आलीय.
शहिदांच्या पश्च्यात त्याच्या पत्नीच्या नावं मदत दिली जाते. मात्र त्यांच्या आई-वडिलांना हलाखीचं जीणं जगावं लागतं. त्यामुळं सरकारनं शहीदांच्या आई-वडीलांना मदत देण्याबाबत धोरण आखण्याची मागणी होतेय.
उतारवयात काबाडकष्ट करुन आपल्या वीरपुत्राच्या मुलांचा सांभाळ शिनगारे दाम्पत्य करतंय. त्यांच्या डोळ्यात आपल्या लेकाच्या शौर्याचा अभिमान तर आहे. मात्र या वयात त्यांच्यावर मजुरी करण्याची वेळ आलीय याहून मोठं दुर्दैव ते कोणतं. सांगली जिल्ह्यात अनेक मंत्री आहेत. त्यांपैकी कुणीतरी या शहीद संजय शिनगारे यांच्या वृद्ध माता-पित्यांना मदतीचा हात देईल का, हा प्रश्न उपस्थित होतोय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, August 15, 2013, 16:10