तांत्रिकाच्या सल्ल्याने नरबळीसाठी दोघांचा खून , murder in pune

तांत्रिकाच्या सल्ल्याने नरबळीसाठी दोघांचा खून

तांत्रिकाच्या सल्ल्याने नरबळीसाठी दोघांचा खून
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

सुबत्ता येण्यासाठी एका तांत्रिकाच्या सल्ल्याने नरबळीसाठी खून केल्याच्या संशयावरुन सुनील पाचंगेला चाकण पोलिसांनी आज अटक केली.

अचानक धनलाभ होण्यासाठी नरबळी देण्याच्या अंधश्रद्धेतून पाचंगेने मित्राचा आणि त्याच्या आईचा एप्रिलमध्ये नियोजनबद्ध खून केल्याची शक्यता पोलीसांनी वर्तवलीय. १८ एप्रिल २०१३ ला दुर्गाष्टमीला रात्री बारा वाजता मित्र धनंजय जगताप याचा लोणावळ्यात तर त्यानंतर दोन दिवसांनी चैत्री नवरात्री समाप्तीला २० एप्रिलला रात्री बारा वाजता मित्राची आई दुर्गाबाई यांचा साबळेवाडी इथे निर्घून खून केला होता.

एकाच कुटुंबातील गरीब माय-लेकरांचे दोन नरबळी अंधश्रद्धेतून देण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने संपूर्ण चाकण परिसरात खळबळ उडाली आहे. या संदर्भात चाकण पोलिसांनी पाचंगेवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.


धन प्राप्त करण्याच्या अंधश्रद्धेपोटी एकाने आपला मित्र व त्याच्या आईचा नरबळी दिला आहे. १० एप्रिलपूर्वी तो एका बुवाला भेटला. त्या बुवाने त्याला भरपूर पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखविले. मात्र, यासाठी एक बाई व पुरुषाचा नरबळी द्यावा लागेल. त्यानंतर तुला पैशाचे लाल गाठोडे मिळेल ते घरी जाऊन उघडायचे, असे सांगितले.

हे सर्व ऐकल्यावर सुनीलच्या डोक्यात नरबळीसाठी कुणाला निवडायचे यासाठी चक्र चालू झाले होते. यातून त्याने हा कट रचल्याचे पुढे आले आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, May 13, 2013, 15:19


comments powered by Disqus