दाभोलकरांना चिमुकल्यांची अनोखी आदरांजली!, ...only for narendra dabholkar

दाभोलकरांना चिमुकल्यांची अनोखी आदरांजली!

दाभोलकरांना चिमुकल्यांची अनोखी आदरांजली!

www.24taas.com, झी मीडिया, सातारा

दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना अजूनही यश आलेलं नाही. असं असलं तरी दाभोलकरांनी अंधश्रद्धेविरोधात सुरु केलेली चळवळ फोफावत चाललीय. यात साताऱ्यातल्या चिमुकल्या मंडळींनीही सिंहाचा वाटा उचललाय.

डॉ. नरेंद्र दाभोलकर... विवेकवाद आणि विज्ञानवादाचे पुरस्कर्ते... साताऱ्यातल्या अनंत इंग्लिश स्कूलमधली चिमुकली मोठ्या आत्मविश्वासानं आणि तळमळीनं अंधश्रद्धेविषयी जनजागृती करताना दिसत आहेत. दाभोलकरांनी अंधश्रद्धाविरोधात हाती घेतलेल्या चळवळीत ही चिमुकली मंडळी त्यांचा सिंहाचा वाटा उचलत आहेत. दाभोलकरांच्या हत्येनंतर राज्य सरकारनं जादूटोणाविरोधी विधेयक मंजूर केलं. याच विधेयकातील मसुद्याची माहिती अनेकांना माहित नाही. याच संदर्भात मसुद्यातल्या १२ कलमांची माहिती सामान्यांना व्हावी यासाठी घरोघरी जाऊन या शाळेतल्या बच्चे कंपनीने अनोखी जनजागृती केली. यावेळी जवळपास मसुद्याची संपूर्ण माहिती देत विद्यार्थ्यांनी पालकांची सही घेतली. जवळपास ३५ हजार नागरिकांना या मोहिमेतून माहिती देण्यात आली.

या जनजागृतीसोबतच विद्यार्थ्यांनी दाभोलकरांच्या हत्येनंतर वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या माहितीच्या आधारे कात्रणांची वही तयार केली. यातून त्यांनी दाभोलकरांचे विचार आणि विज्ञानवाद समजून घेतला. दाभोलकरांनी अंधश्रद्धाविरोधात एक ज्योत पेटवली. त्यांच्यापासून प्रेरणा घेत साताऱ्यातल्या शाळकरी मुलांनी अनोखी जनजागृती करत त्यांना सलाम केला. त्यांचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आणि दाभोलकरांना खरी श्रद्धांजली म्हणावी लागेल.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, October 20, 2013, 17:34


comments powered by Disqus