Last Updated: Wednesday, November 27, 2013, 16:32
www.24taas.com, झी मीडिया, कराड ऊस दरवाढ आंदोलन आता चांगलंच पेटलंय. हे प्रकरण दिल्लीत जाऊनही काहीच तोडगा न निघाल्यानं निराश झालेल्या शेतकऱ्यांनी उद्यापासून ४८ तासांचा म्हणजेच दोन दिवसांचा कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ही घोषणा केलीय. यावेळी ‘क्रिकेटच्या पीचपेक्षा काळी माती महत्त्वाची आहे’ असं म्हणत राजू शेट्टींनी कृषीमंत्री शरद पवार यांनाही जोरदार टोला हाणलाय.
ऊस दराच्या मुद्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळानं पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेतली. गेले अनेक दिवस चर्चेचं गुऱ्हाळ चालवल्यानंतर आता या प्रश्नी समितीचा घाट घालण्यात आलाय. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आलीये. यात अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि अजित सिंह यांचा समावेश आहे. ४ दिवसांत ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे. शिष्टमंडळात सहभागी झालेल्या विरोधी पक्षांचं मात्र या निर्णयामुळे समाधान झालेलं नाही.
याविषयी बोलताना स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी ‘शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका’ असा इशाराच सरकारला दिलाय. तसंच उद्यापासून ४८ तासांचा कडकडीत बंद पाळण्याचा आपला निर्धारही त्यांनी यावेळी जाहीर केलाय.
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं कराड इथे ऊसदराचं आंदोलन पेटलंय. हजारो शेतकरी कराडमध्ये दाखल झालेत. काले इथे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्याचं दहन केलं. २०० शेतक-यांनी शासनाचा निषेध म्हणून मुंडण आंदोलन केलंय. तसंच सरकारचा अंत्यविधी करून तेरावंही घालण्यात आलं.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, November 27, 2013, 16:29