Last Updated: Monday, August 26, 2013, 17:26
www.24taas.com, झी मीडिया, पुणेपुण्यातली एक हत्तीण गेल्या पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. पुण्यातल्या पौर्णिमा हत्तीणीवर अक्षरशः उपासमारीची पाळी आलीय. या हत्तीणीचा मालक पळून गेल्यानं बेवारस झालेल्या या हत्तीणीला कुणीच वालीच उरला नाही.
पुणेकरांना गेल्या अनेक वर्षांपासून परिचित असलेली पौर्णिमा हत्तीण... गेल्या अनेक वर्षांपासून तिचा मालक हत्तीवर बसून पुण्यात भीक मागायचा. अशा पद्धतीनं बेकायदेशीरपणे हत्तीणीची वापर केल्याबद्दल २००९ सालापासून तिच्या मालकावर खटलाही सुरू आहे. त्यामुळे या हत्तीणीला पुण्यातल्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात ठेवण्यात आलं होतं. मात्र कोर्टाच्या परवागानीनंतर वनखात्यानं हत्तीणीला पुन्हा तिच्या मालकाकडे सुपूर्त केलं. आणि पौर्णिमा हत्तीण पुन्हा पुण्यातल्या रस्त्यांवर फिरु लागली. मात्र आता या हत्तीणीचं वय झालं आणि तिच्या उपचारांचा खर्च पेलवेनासा झाला. त्यामुळे मालकानं तिला वा-यावर सोडलं. सध्या ही हत्तीण बेवारसपणे पुण्यात फिरतेय. पण वनविभागाला तिच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही.
या हत्तीणीचा वैद्यकीय आणि आहाराचा खर्च ‘पीपल फॉर एनिमल’ ही संस्था लोकाश्रयाच्या वतीनं करतेय. नुकतीच बंगळुरूच्या ‘वाईल्ड लाईफ रेस्क़्यू’ आणि रिहॅबिलिटेशनच्या डॉक्टर्सनी पुण्यात येऊन हत्तीणीची तपासणी केली. तिला पुढच्या उपचारांसाठी बंगळुरूच्या हत्तीच्या अनाथालयामध्ये हलविण्याची गरज आहे. पण कोर्टात खटला सुरू असल्यामुळे हत्तीणीला इतरत्र हलविण्याची परवानगी मिळत नाहीय.
पौर्णिमा हत्तीणीला बंगळुरूला हलवता येईल का, यासंदर्भात पुढच्या महिन्यात सुनावणी होणार आहे. मुंबईतल्या बिजली हत्तीणीसारखी अवस्था पौर्णिमाची होऊ नये, एवढीच अपेक्षा आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, August 26, 2013, 17:26