सदाशिवराव मंडलीक यांनी दिली राष्ट्रवादीला धमकी, Sadashivrao Mandlik threatened to NCP

सदाशिवराव मंडलीक यांनी दिली राष्ट्रवादीला धमकी

सदाशिवराव मंडलीक यांनी दिली राष्ट्रवादीला धमकी
www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर

कोल्हापूर मतदारसंघावर काँग्रेसचाच हक्क आहे, अशी आग्रही भूमिका खासदार सदाशिवराव मंडलीक यांनी घेतलीय. त्यांच्या या भूमिकेला कोल्हापूर जिल्ह्यातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मोठा पाठींबा मिळतोय. जर कोल्हापूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेलीच तर आपण कोणत्याही पक्षाचा झेंडा हाती घ्यायला तयार आहोत, अशी भूमिका मंडलीक यांनी मांडल्यामुळे सगळ्यांच्या नजरा खासदार मंडलिकांकडे लागल्यात.

आघाडीच्या जागा वाटपात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला येईल असा विश्वास काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी खासदार सदाशिवराव मंडलिक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना दिला होता. पण जागा वाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेल्यामुळे आता मंडलिक नाराज झालेत. वेळ पडली तर थेट आपण महायुतीकडून निवडणूक लढवू असा इशारा मंडलिक यांनी दिलाय.

सदाशिवराव मंडलिक काँग्रेसचे सहयोगी आहेत. त्यामुळे या मतदारसंघावर काँग्रेसचाच हक्क आहे अशी भूमिका जिल्हा काँग्रेसने मांडलीय. खासदार मंडलिक आणि काँग्रेस या जागेवर कितीही दावा सांगत असले तरी जागावाटपाप्रमाणे या जागेवर राष्ट्रवादीचाच हक्क आहे असं हसन मुश्रिफ यांनी म्हटलंय.

सदाशिवरावांचा आजवरचा अनुभव पाहता ते कोणाच्या दबावात आलेले नाहीत. २००९च्या सार्वत्रिक निवडणुकांतही मंडलिकांनी हे सिद्ध केलंय. आता ही जागा काँग्रेसला मिळाली नाही तर आयुष्यभर ज्या सेना भाजपवर त्यांनी जातीयवादी असल्याची टीका केली त्यांच्यासोबत जाण्याचा इशारा त्यांनी दिलाय. त्यामुळे आता यावेळीही मंडलिक ही जागा काँग्रेसच्या पदरात पाडून घेतात आपला हा इशारा खरा करून दाखवतात हे पाहणं औत्सुक्याचं आहे.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, February 25, 2014, 11:49


comments powered by Disqus