तमाशा कलावंत बाळू यांचे मिरज येथे निधन, Scene Actors of Balu died at Miraj

तमाशा कलावंत बाळू यांचे मिरज येथे निधन

तमाशा कलावंत बाळू यांचे मिरज येथे निधन
www.24taas.com, झी मीडिया, सांगली

प्रसिद्ध तमाशा कलावंत काळू-बाळू यांच्या जोडीतील `बाळू` म्हणजेच अंकुश खाडे यांचे आज मिरज येथे निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते.

काळू-बाळू या एका वगनाट्यातील पात्रामुळे लोककलेच्या क्षेत्रात लहू-अंकुश खाडे या कलावंतांची ओळख झाली. पश्चिम महाराष्ट्रातचं नव्हे तर मराठवाडा, खानदेश आणि विदर्भातही खाडे यांच्या तमाशातील त्यांच्या भूमिकेमुळे रसिकांनी त्यांना डोक्यावर घेतले होते.

बाळू म्हणजेच अंकुश खाडे यांचे सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कवलापूर हे मूळगांव होतं. लहू- अंकुश उर्फ काळू- बाळू यांची तमाशा क्षेत्रातील चौथी पिढी कार्यरत होती.

काळू-बाळू यांचा अनेक पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला होता. पुण्याच्या महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय एकात्मता व विश्वबंधू विचार संवर्धन समितीने निर्व्यसनी कलाकार म्हणून या दोघांचा सत्कार केला होता. १९९५ मध्ये बारामतीत झालेल्या अमृतमहोत्सवी नाट्यसंमेलनात पहिला मोरोपंत पिंगळे स्मृती पुरस्कार या दोघांनी शरद पवारांच्या हस्ते स्वीकारला होता.

१९९६ मध्ये महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार, १९९८ ला नाट्यगौरव, राष्ट्रीय पातळीवर नाट्य अकादमी असे शंभराहून अधिक पुरस्कार या जोडगोळीला मिळाले आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, April 26, 2014, 14:02


comments powered by Disqus