पवारांच्या सधन बारामतीत २२ गावे पाण्यासाठी वणवण, serious problem of water Sharad Pawar`s Baramati

काय हे, पवारांच्या सधन बारामतीत २२ गावे पाण्यासाठी वणवण

काय हे, पवारांच्या सधन बारामतीत २२ गावे पाण्यासाठी वणवण
www.24taas.com, झी मीडिया, बारामती

महाराष्ट्राचे मातब्बर नेते आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या बारामतीतील २२ गावं पिण्याच्या पाण्यासाठी झगडतायत. या २२ गावातील गावकऱ्यांचा लढा आतापासून नाही तर गेल्या ४५ वर्षांपासून सुरू आहे. राज्यासमोर आणि देशासमोर बारामतीचा आदर्श मांडला जातो. पण शरद पवारांच्या बारामतीचं सत्य या २२ गावांच्या आंदोलनामुळे समोर आलं आहे.

बारामती हा राज्याचे मातब्बर नेते आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचा बालेकिल्ला... त्यांचे पुतणे अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि कन्या सुप्रिया सुळे बारामतीच्या खासदार... इतके पॉवरफुल राजकारणी असूनही बारामतीपासून हाकेच्या अंतरावर असलेली ही २२ गावं गेल्या ४५ वर्षांपासून पाण्यासाठी तडफडतायत... आता या गावांनी उपोषणाचं हत्यार उपसलंय... आता तरी ही बडी नेते मंडळी या समस्यांकडे लक्ष देणार का असा प्रश्न आहे.

बारामतीचा पश्चिम जिरायती भाग. यात तरडोली , मोरगाव ,जोगवडी, आंबी बुद्रुक, मुर्टी , मुडवे , मोराळ वाडी , जळगाव , लोणी भापकर, पळशी मासाळवाडी या सह अनेक गावातील पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या भागात अजूनपर्यंत कोणतीही अधिकृत अशी सिंचन योजना राबवण्यात आलेली नाही. त्यात सलग तीन वर्षे पुरेसा पाऊस न झाल्याने या भागातील पाझर तलाव, ओढे, नाले कोरडे पडलेत. तर विहिरींनी आताच तळ गाठला आहे. त्यामुळे शेतात असलेली पिक जळण्याशिवाय दुसरा मार्गच राहिला नाही.

खूप शेती असताना पोटाची खळगी भागवण्यासाठी दूरवरच्या बागायती भागात इथल्या शेतकऱ्यांना कामाला जावं लागतंय. शेती असून तरी काय करणार म्हणून काही शेतकऱ्यांनी त्यांची शेती पुण्या-मुंबईच्या बड्या धनदांडग्यांना विकालीय.

पाण्याचा प्रश्न सोडवावा या प्रमुख मागण्यासाठी अंध असलेले मुर्टी गावाचे नामदेव कारंडे ऐन दिवाळीत उपोषणाला बसलेत. याच मागणीसाठी आजपासून आणखी एक अंध तरडोलीत आमरण उपोषण सुरु करणार आहे. बारामतीचे नेते देशात, राज्यात चांगला पाऊस पडला आहे हे त्यांच्या भाषणातून सारखे सांगताहेत मात्र त्यांच्याच तालुक्यातील दुष्काळाकडे ते डोळेझाक करताना दिसत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, November 21, 2013, 16:43


comments powered by Disqus