गारपिटीचा धोका टळणार, गारांचे रूपांतर पाण्यात शक्य.., SnowFall The corresponding risk,

गारपिटीचा धोका टळणार, गारांचे रूपांतर पाण्यात शक्य..

गारपिटीचा धोका टळणार, गारांचे रूपांतर पाण्यात शक्य..
www.24taas.com, वृत्तसंस्था, पुणे

राज्यात मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांत गारपिटीने प्रचंड नुकसान झाले. गारपिटीला भविष्यात तोंड देता येईल का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. मात्र, ते आता शक्य आहे. गारांचे रूपांतर पाण्याच्या थेंबात करता येऊ शकणार आहे. तसे संशोधन विकसित करण्यात आले आहे.

पुण्यात करण्यात आलेल्या संशोधनातून असे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. त्याद्वारे ढगांमध्ये गारांचे पाणी होवून गारांचा पाऊस रोखता येणार आहे. या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर होण्यासाठी आता राज्य किंवा केंद्र सरकारने पुढाकार घेण्याची गरज आहे. पुण्यातील एमआयटी संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.

केंद्रीय कृषी मंत्रालयाअंतर्गत असलेल्या भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) या संस्थेने संशोधनासाठी ३ कोटी रुपये दिले होते. `हेलस्ट्रॉम मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी इन अँग्रीकल्चर` या प्रकल्पांतर्गत हे संशोधन करण्यात आले आहे. गारपिटीमुळे शेतीचे होणारे अतोनात नुकसान टाळण्यासाठी या तंत्रज्ञानाचा मोठा फायदा होऊ शकेल.

कसे असणार तंत्रज्ञान
- ढगातील गारांचे पाण्याच्या थेंबात रुपांतर करणारे तंत्रज्ञान विकसित.
- ढगांचा वेध घेणारे `रडार तंत्रज्ञान` तयार
- हे रडार २०० किलोमीटर त्रिज्येच्या परिसरातील ढगांचा वेध घेवू शकते.
- ढगांमध्ये सोडण्यात येणारी रॉकेट, ज्यामध्ये सिव्हर आयोडाईड व सोडियम क्लोराईड ही रसायने असतील
- ढगांचे विश्लेषण करणारे गणितीय सूत्र तयार करण्यात आलेय
- या सूत्राद्वारे गारासदृश ढग, त्याची दिशा, स्थान, वेग, आकार या गोष्टींचा शोध
- `हेलिकॉप्टर माऊंटेड कॅरीअर्स`ही तयार करण्यात आली आहेत.
- संपूर्ण प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी `हेल स्ट्रॉम (गारांचे वादळ) कंट्रोल सेंटर` निर्माण करणे

- महाराष्ट्रात एका ठिकाणी असे सेंटर उभारल्यास संपूर्ण राज्यातील गारपिटीवर नियंत्रण ठेवता येवू शकते. एका सेंटरची उभारणी आणि यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी ४२ कोटी रुपये खर्च आहे. त्यानंतर प्रत्येक वर्षी नियंत्रणासाठी केवळ ६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

गारांचे पाणी
हेल स्ट्रॉम कंट्रोल सेंटरमधून रडारद्वारे गारासदृश्य ढगांचा वेध घेतला जाईल. या ढगांची दिशा, वेग पाहिल्यानंतर सॅटेलाईटद्वारे सेंटरला याची माहिती मिळेल. आठ रॉकेट बसविलेले हेलिकॉप्टर सेंटरवर सज्ज असेल. यातील चार रॉकेट्समध्ये सिल्व्हर आयोडाईड व अन्य चार रॉकेटमध्ये सोडियम क्लोराईड ही रसायने असतील. सेंटरकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हे हेलिकॉप्टर गारासदृश्य ढगाच्या परिसरातील उतरेल. त्यानंतर त्यावरील रॉकेट ढगामध्ये सोडली जातील.

शून्य अंश सेल्सिअसपेक्षा कमी तपमान असलेल्या ढगांमध्ये सिल्व्हर आयोडाईड आणि शून्य अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तपमान अससेल्या ढगांमध्ये सोडियम क्लोराईड हे रसायने रासायनिक क्रिया घडवून आणतील. ज्याद्वारे पाण्याचे गारांमध्ये होणारे रुपांतर रोखता येईल. अथवा मोठय़ा आकाराच्या गारांचे पाण्याच्या थेंबात रुपांतर करण्याची प्रक्रिया होऊन पाऊस सुरू होईल.

हे संशोधनाला सहा भारतीय पेटंटही मिळाली आहेत. महाविद्यालयातील `कोअर इंजिनिअरिंग अँन्ड इंजिनिअरींग सायन्स` विभागाचे प्रमुख आणि प्रकल्पाचे मुख्य संशोधक डॉ. पी. कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली जयकुमार डी., देबा प्रसाद पाती, श्‍वेता भारद्वाज या संशोधकांचा यात सहभाग आहे.

या प्रकल्पाचे सादरीकरण २५ मार्च रोजी `आयसीएआर`समोर केले जाणार आहे. त्यानंतर परिषदेकडून केंद्र सरकारकडे शिफारस केली जावू शकते, असे डॉ. पी. कुमार यांनी स्पष्ट केले आहे.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


झी २४ तासला ट्विटरवर फोलो
करा.

First Published: Tuesday, March 18, 2014, 14:05


comments powered by Disqus