राहुल बोले, सरकार चाले- अण्णा - Marathi News 24taas.com

राहुल बोले, सरकार चाले- अण्णा

झी २४ तास वेब टीम, राळेगणसिद्धी
 
कनिष्ठ दर्जाच्या कर्मचाऱ्यांना लोकपालच्या कक्षेतून वगळल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारवर विश्वासघात केल्याचा आरोप लावला आहे. कनिष्ठ कर्मचाऱ्यांना वगळण्याचा निर्णय हा काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांच्यामुळेच पंतप्रधानांनी घेतल्याचाही आरोप अण्णांनी यावेळी केला. सरकारने आपले वचन पाळले नाही तर जनताच त्यांना वठणीवर आणेल, असा इशाराही अण्णांनी यावेळी दिला.
 
लोकपाल बिलच्या ड्राफ्टमधून अखेर क्लास थ्री कर्मचा-यांना बाहेर ठेवण्याचाच निर्णय संसदेच्या स्थायी समितीने घेतल्यानंतर आज अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीत पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी सरकारवर विश्वासघाताचा आरोप लावला.
 
उपोषणाला बसलो होतो, त्यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पत्र पाठवून प्रभावी लोकपाल कायदा आणण्याच्या आपल्या मताशी सहमत असल्याचे सांगितले होते. तसेच लोकपालच्या कक्षेत क आणि ड दर्जाच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश करण्यावर सहमती दर्शविली होती. तसे आश्वासनही मला दिले होते. मात्र, आता कायदा बनविताना सरकार कोलांटउडी घेत असल्याचा आरोप अण्णा हजारे यांनी केला.
 
अशा प्रकारचे कनिष्ठ कर्मचाऱ्यांना वगळण्याचा निर्णय घेणे, यामागे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा हात आहे. त्यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे. देशाची सरकार पंतप्रधान नाही तर राहुल गांधींच्या म्हणण्याप्रमाणे चालते. त्यामुळे माझा हा मागे राहुल गांधी यांचाच हात असल्याचा अंदाज आहे. ज्या ठिकाणी धूर निघतो, त्या ठिकाणी आग लागलीच असते, अशी पुस्ती जोडत अण्णांनी राहुल गांधी यांना टार्गेट केले.
 
पंतप्रधानांनी पत्र पाठवून आश्वासन दिले होते. मात्र, आता कायदा करताना ते माघारी फेरत आहेत. त्यामुळे हा माझा नाही, तर देशाचा जनतेचा विश्वास घात असल्याचेही अण्णांनी सांगितले. देशातील अनेक राजकीय पक्षांचे कनिष्ठ  कर्मचाऱ्यांशी साटेलोटे आहे. त्यामुळेच भ्रष्टाचार होतो, त्यामुळे कनिष्ठ कर्मचाऱ्यांना या कक्षेत न घेण्याचा निर्णय त्या राजकीय हेतूने घेतला असल्याचेही अण्णांनी यावेळी सांगितले.

First Published: Friday, December 2, 2011, 13:54


comments powered by Disqus