Last Updated: Thursday, May 24, 2012, 14:50
www.24taas.com, पुणे महार वतनाची जमीन बळकावल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वहिनी शर्मिला पवार यांच्याविरोधात पुण्यातल्या पौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जिल्हाधिका-यांची बनावट ऑर्डर तयार करुन ही जमीन बळकावल्याचा आरोप शर्मिला यांच्यावर आहे.
पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यात रीहे गावातली ही जमीन आहे. या जमिनीपैकी काही जमीन अजित पवारांच्या वहिनी शर्मिला पवार यांनी बळकावल्याचा आरोप जमिनीचे मालक असलेल्या शेतक-यांनी केला होता. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी केली होती. याबाबत ऑर्डर बोगस असल्याचं पत्र जिल्हाधिका-यांनी दिल्यानंतर शर्मिला पवार यांच्याविरोधात बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केलाय.
फसवणूक, बनावट सरकारी आदेश तयार करणे, सरकारी कागदपत्रात फेरफार करणे या आरोपांखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळं उपमुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्याचं आयतं कोलीत विरोधकांच्या हाती लागलंय.
First Published: Thursday, May 24, 2012, 14:50