खुर्च्यांना चिकटले पालिकेचे अधिकारी! - Marathi News 24taas.com

खुर्च्यांना चिकटले पालिकेचे अधिकारी!

www.24taas.com, पिंपरी चिंचवड
 
पिंपरी-चिंचवड म्हटलं की समोर येते ती, महापालिका आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची इथली मजबूत पकड... प्रशासनावर पकड म्हणूनच ख्याती असलेल्या अजित पवार यांच्या या महापालिकेत मात्र प्रशासनातील अनेक अधिकारी कित्येक वर्ष एकाच जागी काम करत असल्याचं समोर आलंय. काही अधिकारी तर महापालिकेत रुजू झाल्यापासून २७ वर्ष एकाच ठिकाणी चिकटून असल्याचं स्पष्ट झालंय. नवीन आयुक्त श्रीकर परदेशी यांनी तरी यात लक्ष घालून या अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्यात, अशी मागणी केली जातेय.
 
पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतले अधिकारी आणि त्यांच्या पदाचा कालावधी जर पाहिला तर धक्का बसल्याशिवाय बसणार नाही. उदाहरणच द्यायचं झाल तर पालिकेचे सुरक्षा अधिकारी अशोक दळवी २२ वर्षे त्याच पदावर आणि त्याच विभागात सेवेत आहेत. यशवंतराव चव्हाण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर आनंद जगदाळे हे १९ वर्षांपासून त्याच पदाला चिटकून आहेत. संगणक विभागाचे नीलकंठ पोमण १७ वर्षांपासून त्याच विभागात आहेत. त्याचप्रमाणे उद्यान अधीक्षक सुरेश साळुंखे २२ वर्षे, बांधकाम विभागाचे उपशहर अभियंता वसंत काची ७ वर्षे, क्रीडा अधिकारी रझ्झाक पानसरे १६ वर्षे असे किती तरी अधिकारी गेली कित्येक वर्ष एकाच पदाला चिटकून आहेत. त्यात प्रवीण तुपे, शहाजी पवार, अशोक मुंढे अशा किती तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही नावं आहेत. वास्तविक पाहता नियमानुसार अधिकाऱ्य़ांची बदली ३ वर्षातच होणे गरजेचे आहे. त्यामुळेच या अधिकाऱ्यांचे अनेकांशी लागे बांधे झालेत आणि त्यामुळेच भ्रष्टाचार फोफावाल्याचा आरोप आता होतोय. या अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करण्याची मागणी होतेय.
 
या पूर्वीही हा मुद्दा अनेकदा चर्चेत आला. पण या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या नाहीत. आता श्रीकर परदेशी यांच्या रुपानं पालिकेला नवे आयुक्त मिळालेत. ते तरी या अधिकाऱ्यांच्या बदल्या करतील का, असा प्रश्न उपस्थिथ झालाय.
 
 

First Published: Wednesday, July 4, 2012, 20:35


comments powered by Disqus