Last Updated: Thursday, July 12, 2012, 13:17
www.24taas.com, पुणे कॉल सेंटरवर कादंबऱ्या लिहिल्या गेल्या... चित्रपटदेखील आले. मात्र, एका वेगळ्या कॉल सेंटर सध्या पुण्यात पाहायला मिळतंय... हे आहे अंध व्यक्तींचे कॉल सेंटर. टेलिफोन क्षेत्रातील मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीचं काम अंधांच्या कॉल सेंटरला मिळाले आहे. अंध व्यक्तीच या कॉल सेंटरचे सर्व काम यशस्वीपणे हाताळत आहेत.
कानाला हेडफोन लावून मोबाईलच्या माध्यमातून अखंड सुरु असलेली बडबड. त्याचवेळी समोर असलेल्या संगणकावर सूरु असलेलं काम... हे चित्र आहे एका कॉल सेंटरमधील. परंतू इथं काम करणाऱ्या सर्व व्यक्ती अंध आहेत. हडपसर येथील रामवाडीमध्ये जून महिन्यापासून हे कॉल सेंटर सुरु झालंय. सध्या या कॉल सेंटरमध्ये १९ अंध व्यक्ती काम करतायत. काचेच्या पॉश इमारती आणि चकाचक अंतर्गत रचना इथं नसली तरी कामाच्या दर्जावर याचा परिणाम होत नाही. इतर कुठल्याही कॉल सेंटरच्याच दर्जाचे काम इथं होतं.
‘पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशन’मार्फत हे कॉल सेंटर चालवलं जातंय. एका बहुराष्ट्रीय टेलिफोन कंपनीनं त्यांना हे काम दिलंय. कॉल सेंटरनं इथं काम करणा-या अंध व्यक्तींमध्ये वेगळा आत्मविश्वास निर्माण केलाय.
चार महिन्यानंतर या कॉल सेंटरचा दुसरा टप्पा सुरु केला जाणार आहे. अंधांसाठी काम करणाऱ्या अनेक एनजीओंनी याबबत असोसिएशनकडं विचारणा केली असून लवकरच अंधांना कॉल सेंटरचे प्रशिक्षण देणारा स्वतंत्र कोर्सही सुरु केला जाणार आहे.
First Published: Thursday, July 12, 2012, 13:17