शेतकऱ्यांना फायदा देणारं 'स्वीट कॉर्न' - Marathi News 24taas.com

शेतकऱ्यांना फायदा देणारं 'स्वीट कॉर्न'

www.24taas.com, सांगली
 
सांगली  जिल्ह्यतल्या  मिरज पुर्व  आरग गावातील बाबासो पाटील या शेतक-यानं दुष्काळावर मात करीत स्वीटकॉर्नची लागवड केली. हे पीक अवघे तीन महिन्यात जास्तीत  जास्त  उत्पन्न  देतं आणि जनावरांसाठी  वैरण ही  भरपूर  तयार होते. त्यामुळे आरग गावातील 200 हेक्टरवर या पिकाची लागवड होत असून इथला शेतकरी दुष्काळावर मात करतोय.
 
आरगा गाव दुष्काळी  टप्यात  येते. मात्र या  गावाशेजारून  कॅनल  गेल्यामुळे काही शेतक-यांना पाणी उपलब्ध झालंय. मात्र पाणी टंचाईचा विचार करून आरग गावातील  शेतकऱ्यांनी स्वीटकॉर्नची लागवड केली. अवघ्या तीन महिन्यात उत्पादन देणारं हे पीक चांगले पैसे तर देतंच तसंच जनावरांना चाराही उपलब्ध होतो.
 
या आधी साधा मका, ज्वारी,सोयाबीन, मुग,यासारखी पिके घेतली जात होती.मात्र दुहेरी फायद्यामुळे स्वीटकॉर्नच्या लागवडीकडे शेतक-यांचा कल वाढतोय. आरग गावातील बाबासो पाटील यांनी मात्र ह्या पिकाचं महत्व ओळखून गेल्या तीन वर्षांपासूनच या पिकाची लागवड केलीय.
 
बाबासो पाटील यांनी एका एकर लागवडीसाठी १४ हजार रुपये खर्च केलाय. बियाण्यासाठी तीन हजार रुपये, खतासाठी सात हजार रुपये  आणि मशागतीसाठी दोन हजार रुपये.यापासून त्यांना एकरी स्विट कॉर्नचं १५ क्विंटलंचं तर चा-याचं १७ टन उत्पादन मिळतं..स्विटकॉर्नला तीन हजार रुपये दरा प्रमाणे त्यांना ४५ हजारांचं उत्पादन मिळतं तर  १७ टन चा-याचे ३० हजार रुपये मिळतात असे एकूण त्यांना ७५ हजार रुपयांचं उत्पन्न मिळतं खर्च वजा जाता ६० हजारांचं निवळ नफा त्यांना शिल्लक राहतो.स्विटकार्नची मागणी शहरात बर्गर, पीझा, कॉर्नसूप, कॉर्न मंचुरियन या खाद्य पदार्थांसाठी वापरला जात  असल्याने शेतक-यांचा हा माल मुबई, बेंगलोर, गोवा, हैद्राबाद, इथे पाठवला जातो.
 
स्वीटकॉर्नमुळे शेतक-यांना ख-या अर्थाने आर्थिक स्थिरता मिळालीय. यामुळेच आज रोजी आरगा गावातील स्वीटकॉर्नची लागवड २०० हेक्टरवर जाऊन पोहोचलीय. अशा प्रकारे दुष्काळातही शेतक-यांच्या जीवनात ख-या अर्थानं स्विटकॉर्नमुळे गोडवा निर्माण झालाय.

First Published: Thursday, August 2, 2012, 10:43


comments powered by Disqus