खाणीतले दगड, करती जगणं अवघड - Marathi News 24taas.com

खाणीतले दगड, करती जगणं अवघड

झी २४ तास वेब टीम, पुणे
 
पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या बेकायदा दगडखाणींचा प्रश्न ऐरणीवर आलाय. दगडखाणींमुळे परिसरातील शेती धोक्यात आलीये. खाणीमुळे निघोटवाडी गावातील लोकांना अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतोय.
 
निघोटवाडीची शेतीच धोक्यात आलीये. निघोटवाडी गावाजवळ एक, दोन नव्हे तब्बल पाच दगडांच्या खाणी आहेत. या दगडांच्या खाणींजवळ सातत्यानं स्टोनक्रशर सुरु असतात. त्यामुळं परिसर कायम धुळीत बुडालेला असतो. धुळीमुळं पिकांवर विपरीत परिणाम झालेत. पाण्याची भूजल पातळी खालावलीये. लोकांचं आरोग्य धोक्यात आलयं. दगडाच्या खाणी निघोटवाडीच्या अगदी जवळ आहेत. त्यामुळं भुसुरुंग स्फोटात उडालेले दगड मानवी वस्तीत येवून पडतात. अशा घटनांमध्ये अनेक गावकरी जखमी झालेत. शिवाय स्फोटांच्या हादऱ्यानं अनेक घरांच्या भिंतींना तडेही गेलेत. शाळेच्या इमारतीवर पडणारे दगड तर नित्याची बाब झालीये. त्यामुळं चिमुरडे विद्यार्थी जीव मुठीत धरुन शिकतायेत.
 
गावकऱ्यांनी ग्रामसभेत खाणविरोधी ठराव केल्यानंतर दोन महिने खाणी बंद ठेवल्या. मात्र त्यानंतर त्या पुन्हा सुरु करण्यात आल्या. आंबेगावचे तहसीलदार खाणी बंद असल्याचं ठामपणं सांगताय़ेत. विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघ असलेल्या आंबेगाव तालुक्यात बेकायदा  दगड खाणी सुरु आहेत. या खाणी बंद करण्य़ासाठी गावकऱ्यांनी विधानसभा अध्यक्षांनाच साकडं घातलंय.
 

First Published: Saturday, December 17, 2011, 17:38


comments powered by Disqus