Last Updated: Saturday, December 24, 2011, 22:25
झी २४ तास वेब टीम, पुणे जलचर बनून पाण्याखालची दुनिया बघण्याची संधी पुणेकरांना मिळाली आहे. एमटीडीसी आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजीकल पार्कच्यावतीनं स्कूबा डायव्हींग शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. बालेवाडीतल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात स्कूबा डायव्हिंगचा अनुभव घेता येणार आहे.
'जिंदगी ना मिलेगी दुबारा' या सिनेमातील स्कूबा डायव्हिंगमुळं नायकाचा जीवनाकडं बघण्याचा दृष्टीकोन बदलून जातो. निळ्याशार समुद्राच्या तळाशी असलेली सागरी जीवसृष्टी पाहण्याचा योग केवळ टीव्ही आणि सिनेमामधूनच येतो. एक अमूल्य अनुभूती म्हणून स्कूबा डायव्हींगकडं बघावं लागेल. तसंच पर्यटन विकास, सागर संशोधन, पर्यावरण रक्षण आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टीकोनातून स्कूबा डायव्हींगला महत्व आहे. असं असलं तरी आपल्या देशात हा प्रकार फारसा रुजला नाही. महाराष्टाच्या कोकण किनाऱ्यावर स्कूबा डायव्हिंगला चालना देण्याचा प्रयत्न एमटीडीसीकडून सुरु आहे. त्याच अनुषंगानं पुण्यातल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात खास प्रशिक्षण शिबिराचं आयोजन कऱण्यात आलंय.
या प्रशिक्षण शिबिरात सागरी पर्यावरण बघता येणं शक्य नसलं तरी नाताळच्या निमित्तानं पाण्याखाली सांताक्लॉजच्या लीला पाहता येणारेत. २५ डिसेंबर ते ५ जानेवारी दरम्यान हे शिबीर होणार आहे. यासाठी प्रतिव्यक्ती पंधराशे रुपये शुल्क आकारलं जाईल. आतापर्यंत केवळ पाहण्यापुरतं मर्यादीत असलेलं स्कुबा डायव्हिंग पुणेकरांना प्रत्यक्षात अनुभवता येणाराय.
First Published: Saturday, December 24, 2011, 22:25