आंदोलन कुठल्याही पक्षा विरोधात नाही – अण्णा - Marathi News 24taas.com

आंदोलन कुठल्याही पक्षा विरोधात नाही – अण्णा

झी २४ तास वेब टीम, राळेगणसिद्धी
 
आंदोलन कुठल्याही पक्ष, व्यक्ती विरोधात नाही. तर भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन आहे. आज भ्रष्टाचाराने देशात थैमान घातले आहे. सामान्य माणसाला जीवन जगण कठीण झाले आहे, त्यामुळे आता मुंबईतील तीन दिवसांच्या आंदोलनानंतर दिल्लीत सोनिया गांधींच्या घरासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज येथे स्पष्ट केले.
 
राळेगणसिद्धीहून आळंदीकडे रवाना होण्यापूर्वी  अण्णा हजारे यांनी राळेगणच्या गावकऱ्यांशी बातचीत केली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
 
गेली २५ वर्षे आपण भ्रष्टाचाराविरोधात लढत आहोत. अजूनही सरकार म्हणावं तसं लक्ष देत नाही आहे. स्वातंत्र्याची ६५ वर्षे उलटली आहे. भ्रष्टाचाराला आळा घालावा म्हणून एक कायदा सरकारने तयार केला नाही. माहितीच्या आधिकारासाठी आम्हांला १० वर्षे झगडावे लागले, आता सरकारला समजेल अशा भाषेत उत्तर देण्याची वेळ आली असल्याचे अण्णांनी सांगितले. 
 
जनलोकपाल सारखा एक सुंदर कायदा सरकारने करावा, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे. ४२ वर्षांमध्ये ८ वेळा लोकपाल विधेयक संसदेत मांडेल परंतु ते अद्याप मंजूर झाले नाही. यावरून असे स्पष्ट झाले की सरकारची नियत साफ नाही. हे सरकार सत्ता आणि पैशाच्या मागे लागले आहे. सत्तेमधून पैसा आणि पैशामधून सत्ता यात सरकार फिरते आहे. सरकार आंधळं झालं आहे. त्यामुळे आम्हांला वेळोवेळी उपोषण करण्याची वेळ येते.
 
मुंबईतील आंदोलनाचा कार्यक्रम
अण्णा हजारे उद्या जुहूतील महात्मा गांधींचा पुतळ्याला हार अर्पण करून एका भव्य रॅलीच्या माध्यमातून एमएमआरडीए ग्राऊंडवर ते जाणार आहेत.
उद्यापासून मुंबईत उपोषण सुरू होत आहे. २७-२८-२९ तीन दिवस उपोषण करून दिल्लीत जाणार आहे.
 
 
दिल्लीतील कार्यक्रम
मुंबईतील आंदोलन संपल्यानंतर ३० तारखेला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या घरासमोर दिल्लीत आंदोलन करणार आहेत. दिल्लीत थंडी जास्त आहे. पण दिल्लीत रामलीला मैदानावर इतर राज्यातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते दाखल होणार आहे.
 
 

 
 
 

First Published: Monday, December 26, 2011, 16:53


comments powered by Disqus