सतीश शेट्टी हत्त्येचा अजूनही उलगडा नाहीच - Marathi News 24taas.com

सतीश शेट्टी हत्त्येचा अजूनही उलगडा नाहीच

www.24taas.com, पुणे
 
पुण्यात तळेगाव दाभाडेमधल्या सतीश शेट्टी यांच्या हत्येला आज दोन वर्षं पूर्ण होत आहेत. मात्र दुर्दैवानं या हत्या प्रकरणाचा अजून उलगडा झालेला नाही. सतीश शेट्टी यांची हत्या कोणी आणि कशासाठी केली, हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत.
 
RTI कार्यकर्ते सतीश शेट्टी यांची १३ जानेवारी २०१० ला हत्या झाली. अज्ञात हल्लेखोरांनी भर दिवसा त्यांच्यावर वार करुन त्यांची हत्या केली. शेट्टी यांनी तळेगाव परिसरातले अनेक गैरव्यवहार उघडकीला आणले होते. त्यातूनच त्यांची हत्या झाल्याचं बोललं जातं. याप्रकरणी पोलिसांनी गुंड श्याम दाभाडे याच्यासह पाच जणांना अटक केली होती. पण आरोपींनी सतीश शेट्टींच्या हत्येचा कट रचला होता, इतपतच पुरावे पोलीस गोळा करु शकले. हत्या नेमकी कुणी केली आणि कशासाठी केली, याची उत्तरं दोन वर्ष उलटल्यावरही पोलिसांकडे नाहीत. दरम्यानच्या काळात हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी शेट्टी कुटुंबियांनी केली होती. त्यालाही वर्ष झालं. तरीही तपासात प्रगती नाही.
 
सतीश शेट्टी यांच्या हत्य़ेसंदर्भात माहिती देणा-याला सीबाआयतर्फे पाच लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय. पण अजूनही धागेदोरे उलगडत नाहीय़त. समस्यांसाठी झगडणा-या एका सामाजिक कार्यकर्त्याला त्याच्या मृत्यूनंतर तरी न्याय मिळेल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
 

First Published: Friday, January 13, 2012, 23:59


comments powered by Disqus