अपराध घडे, 'सीसीटीव्ही' पाही भलतीकडे ! - Marathi News 24taas.com

अपराध घडे, 'सीसीटीव्ही' पाही भलतीकडे !


अरूण मेहेत्रे, www.24taas.com, पुणे

 
पुणे शहराच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी शहरामध्ये सत्तर ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. असं असताना २५ जानेवारीला पुणेकरांना चिरडत धावणारी बस एकाही कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाली नाही. या यंत्रणेतल्या त्रुटी या निमित्तानं उघड झाल्या आहेत.
 
स्वारगेट परिसरातल्या जेधे चौकात  २५ जानेवारीला पुण्यात थैमान घालणारी बस कुठल्याच सीसीटीव्हीमध्ये कुठेच दिसली नाही. सकाळी आठच्या दरम्यान संतोष मानेची बस याच भागातून गेली पण ती सीसीटीव्ही फुटेजमध्ये टिपलीच गेली नाही, याचं कारण म्हणजे या ठिकाणचा फिरता कॅमेरा. बस चौकातून गेली तेव्हा कॅमेऱ्याची नजर भलतीकडेच होती. या कॅमेऱ्यांच्या फुटेजवर लक्ष ठेवणारी एक कंट्रोल रुमही आहे. पण इथलेही अनेक मॉनिटर नो सिग्नलच दाखवत आहेत.
 
महापालिकेनं ९ कोटी रुपये खर्चून मोठा गाजावाजा करत सत्तर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. मात्र त्यामध्येच आता खूप त्रुटी असल्याचं समोर आलं आहे. जर्मन बेकरी बॉम्बस्फोट असो किंवा संतोष मानेच्या एसटी बसचं तांडव, पुणेकर सुरक्षित नाहीत, हेच सांगणाऱ्या या घटना आहेत. सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवले आहेत, पण त्यांची नजरच अधू झाली असेल तर पुणेकर सुरक्षित कसे राहणार ?

First Published: Friday, January 27, 2012, 19:13


comments powered by Disqus