Last Updated: Thursday, February 23, 2012, 20:57
www.24taas.com, पुणे पुणे महापालिका निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाला आतापर्यंत साडे सहा कोटींचा खर्च आला आहे. निवडणूक आयोग स्वतः निवडणुकीसाठी इतका खर्च करत असताना उमेदवाराला मात्र चार लाखांच्या खर्चाचंच बंधन होतं.
निवडणुकीत निवडणूक आयोगानं एका उमेदवारासाठी खर्चाची मर्यादा चार लाख इतकीच निश्चित केली होती. पण त्याचवेळी निवडणूक आयोगाला मात्र पुण्यात प्रत्येक वॉर्डात निवडणूक घेण्यासाठी ८ लाख ५५ हजार इतका खर्च आला आहे. त्यामुळे पुणे महापालिका निवडणुकीसाठी आयोगाला आतापर्यंत तब्बल ६ कोटी ५० लाख रुपये खर्च करावे लागले आहेत. या खर्चात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
एका वॉर्डात निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगानं स्वतःची मर्यादा १३ लाख इतकी ठेवली आहे, असं असताना उमेदवाराला मात्र चार लाखात खर्च भागवताना मोठी कसरत करावी लागली. वाढलेली मतदान केंद्र त्यामुळं वाढते कर्मचारी, वाहनं या सगळ्यामुळे खर्च वाढल्याचं समर्थन करण्यात येतंय. आणखी आश्चर्याची बाब म्हणजे हा खर्च आयोगानं नाही तर पुणे महापालिकेनं केलाय.
First Published: Thursday, February 23, 2012, 20:57