ऊसाचे झालं राजकीय चिपाड - Marathi News 24taas.com

ऊसाचे झालं राजकीय चिपाड

झी २४ तास वेब टीम, सातारा
 
शेतकरी आंदोलनांमुळे सहकारक्षेत्रात तणावाचे वातावरण निर्माण झालेय. उसाला दर मिळाला पाहिजे, साखर निर्यात बंदी उठवली पाहिजे, असं मत केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी व्यक्त केलंय.
 
साता-यात किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या गळित हंगामाचा शुभारंभ विलासरावांच्या हस्ते झाला. त्यावेळी विलासरावांनी चांगलीच बॅटिंग केली. सहकारातलं ज्यांना काहीच कळत नाही, अशी मंडळी केंद्रात निर्णय घेतात, असा टोला लगावत विलासरावांनी स्वकीयांनाच कोपरखळी मारली.
 
कोल्हापूर, सांगली, साता-यानंतर आता पुणे जिल्ह्यातही ऊसदरवाढीचं आंदोलन पेटलंय. बारामती इथल्या माळेगाव साखर कारखान्यावर ऊस उत्पादकांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब तावरे यांच्या गाडीसह ऊस वाहतूक करणा-या गाड्यांचीही तोडफोड करण्यात आली. शेतकरी कृती समितीच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं.
 
दरम्यान,  शेतक-यांचे नेते म्हणवून घेणारे शरद पवारही कारखानदारांच्या बाजूनं उतरलेत. त्यामुळंच त्यांनी अशा आंदोलनामुळं साखर उद्योगाची अवस्था मुंबईतल्या कापड गिरण्यांसारखी होईल, अशी भविष्यवाणी केलीय. उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही गेल्या काही दिवसांपासून शेतकरी संघटनांच्या नेत्यांवर आगपाखड सुरु केलीय.
 
पवार काका-पुतण्यांनी साखऱ कारखानदारांची घेतलेली बाजू ऊस उत्पादक शेतक-यांना पसंद पडलेली नाही. राजू शेट्टींची आत्मक्लेष यात्रा बारामतीत दाखल होत असल्यानं आंदोलनावर तोडगा काढण्याऐवजी काका-पुतण्यांनी शेतकरी संघटनांच्या नेत्यांना टार्गेट करायला सुरुवात केलीय.त्यामुळं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये याचा फटका राष्ट्रवादीला बसल्याशिवाय राहणार नाही, असं जाणकांरांकडून सांगण्यात येतंय.

First Published: Monday, November 7, 2011, 04:23


comments powered by Disqus