मुलीच्या मृत्युने कुटुंबाचा दुर्दैवी अंत - Marathi News 24taas.com

मुलीच्या मृत्युने कुटुंबाचा दुर्दैवी अंत

www.24taas.com, सातारा
 
एक मध्यमवर्गीय कुटुंब, अनेक वर्षांनी त्यांना झालेली मुलगी, या मुलीचा झालेला मृत्यु आणि त्याचा धक्का सहन न झाल्यामुळं आईवडिलांचीही संपलेली जीवनयात्रा, अशी काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे, सातारा जिल्ह्यातल्या मलकापूरमध्ये. कराड पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
 
ही हृदयद्रावक कथा आहे सातारा जिल्ह्यातल्या मलकापूरमधली. लाडक्या लेकीच्या मृत्युमुळं हताश आईबापानं संपवलेल्या जीवनप्रवासाची. उज्ज्वला आणि विजय सातारकर या दांपत्याला अनेक वर्षांनी मुलगी झाली. मुलगी आजारी असल्यामुळं तिच्यावर कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान या ९ वर्षांच्या लाडक्या मुलीचा मृत्यू झाला.
 
याचा मानसिक धक्का सहन न झाल्यामुळं उज्ज्वला सातारकर या तिच्या आईनं गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. तर पत्नी आणि मुलगी दोघींशिवाय जगण्याच्या कल्पनेनंच हृदयविकाराचा झटका येऊन विजय सातारदेखील मरण पावले. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेनं मलकापूर परिसरात दुःखाचं सावट आहे. कुणाचाच दोष नसताना घडलेली ही घटना सगळ्यांच्याच जीवाला घोर लावणारी आहे.
 
 

 
 
 
 

First Published: Tuesday, February 28, 2012, 09:38


comments powered by Disqus