'पहिली' कन्याशाळा, बनली 'मधुशाला' ! - Marathi News 24taas.com

'पहिली' कन्याशाळा, बनली 'मधुशाला' !

नितीन पाटोळे, www.24taas.com, पुणे
 
मुलींसाठी पहिली शाळा सुरू झाली ती पुण्यातल्या भिडे वाड्यात. महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी ही शाळा सुरू केली. पुण्यात हा भिडे वाडा आजही आहे. मात्र हा ऐतिहासिक भिडे वाडा शेवटच्या घटका मोजतोय. एवढंच नाही, तर हा वाडा चक्क दारुड्यांचा अड्डा बनलाय़.
 
पुण्यातल्या बुधवार पेठेतल्या  भिडे वाड्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी १४ जानेवारी १८४८ ला मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. आज मात्र हा वाडा मोडकळीला आलाय. एवढंच नाही तर  ही जागा दारुड्यांचा अड्डा झाल्याचं समोर आलंय. घाण आणि कचऱ्यामुळे वाड्यात पाय ठेवायलाही जागा नाही.
 
दीडशे दोनशे वर्षांपूर्वीचा भिडे वाडा ऐतिहासिक वारसा आहे. त्याला हेरिटेजचा दर्जाही नुकताच देण्यात आलाय. या वास्तूचे जतन करण्यासाठी साधी डागडुजीही करावी, असंही महापालिकेला वाटलं नाही. डागडुजी सोडाच पण निदान ही वास्तू दारुड्यांचा आणि जुगाराचा अड्डा ठरु नये, याच्याही उपाययोजना करण्याची तसदी महापालिकेनं घेतली नाही.
 
हायकोर्टात या वाड्याच्या जागेसंदर्भात काही वाद सुरू आहेत. त्याची सबब या वाड्याच्या दुरवस्थेसाठी देण्यात येतेय. मात्र या सगळ्या पळवाटा आहेत. मुलींच्या पहिल्या शाळेसह इतर सामाजिक उपक्रमांचा हा वाडा साक्षीदार आहे. पण इतिहास फक्त शाळांपुरताच मर्यादित राहिलाय, त्याचा अभिमान सोडाच विसरच पडल्याचं या अवस्थेवरुन दिसतंय.
 
 

First Published: Tuesday, February 28, 2012, 17:14


comments powered by Disqus