Last Updated: Thursday, March 22, 2012, 18:02
www.24taas.com, मुंबई ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, समाजसेवक नागनाथअण्णा नायकवडी यांचे दीर्घ आजाराने वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. गेली काही दिवस त्यांची प्रकृती खालवल्याने त्यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
स्वातंत्र्यलढ्यात नागनाथअण्णा नायकवडी यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. क्रांतीसिंह नाना पाटील यांच्य प्रती सरकारच्या लढ्यात ते अग्रभागी होते. नायकवडींनी विद्यार्थीदशेत असतानाच वस्तीगृहातून पळ काढून स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. नायकवडींमुळे त्यांच्या वडिलांनाही तुरुंगवास घडला.
नागनाथअण्णांनी आयुष्यभर शोषितांसाठी संघर्ष केला मग तो दुष्काळी गावांच्या पाण्याचा प्रश्न असो की कृष्णा खोऱ्याचा. सांगली जिल्ह्यात वाळवा इथे सहकारात आदर्श ठरलेल्या हुतात्मा किसन अहीर सहकारी साखर कारखान्याची स्थापना त्यांनी १९८३ साली केली. महाराष्ट्रातल्या सहकारी साखर कारखानदारी पारदर्शक कारभारासाठी या कारखान्याचे नाव आदराने घेतलं जातं. आजवर फक्त एक अपवाद वगळता या कारखान्याच्या सर्व निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.
गेली पंचवीस वर्षे आशिया खंडात सर्वात जास्त क्षमतेने हा कारखाना चालवण्याच्या विक्रमामुळे नागनाथअण्णांना हुतात्मा पॅटर्नचे शिल्पकार म्हणूनही ओळखलं जातं. उसतोडणी मजुरांसाठी ४०० घरे या कारखान्याने बांधली. साखर कारखान्याचा हिशेब उघडपणे बोर्डावर लिहिणारा तो पहिला आणि आजही एकमेव कारखाना आहे. किल्लारी भूकंपात अनाथ झालेल्या १५० मुलांवर मायेचं छत्र या कारखान्याने धरलं. आज ही मुलं स्वावलंबी झाली आहेत.
चौदा तालुक्यातील दुष्काळ संपावा म्हणून त्यांनी गेली २० वर्षे संघर्ष केला. आयुष्याच्या अखेरपर्यंत नागनाथअण्णा कार्यरत राहिले. पद्मभूषण, महाराष्ट्र भूषण, रयत माऊली आणि महाराष्ट्र फाऊंडेशनच्या पुरस्कारांनी नागनाथअण्णांना सन्मानित करण्यात आलं होतं.
First Published: Thursday, March 22, 2012, 18:02