परप्रांतियांना सत्ताधारी गोंजारत आहेत - राज - Marathi News 24taas.com

परप्रांतियांना सत्ताधारी गोंजारत आहेत - राज

झी २४ तास वेब टीम, पुणे
 
मुंबईतील आरे डेअरीची वाट लागली. बारामतीमधल्या खासगी डेअरींची भरभराट सुरू आहे. राज्याबाहेरून दूध आणले जाते, हे कशासाठी ?  कापूस उत्पादक शेतकरी तडफडतो आहे. परप्रांतियांना तुम्ही गोंजारता. मराठी माणूस प्रश्नांसाठी रस्त्यावर आला की काठय़ा मारता, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. यावेळी गृहमंत्री आर. आर. पाटलांच्या 'हाईट'वर कोटी केली.
 
महाराष्ट्र नवनिर्माण एस.टी. कामगार सेनेच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनाचा समारोप ठाकरे यांच्या विराट सभेने झाला. त्यावेळी ते बोलत होते. राज्याचे जे-जे आहे ते खासगी क्षेत्राला दिले जात आहे. विकले जात आहे.  एकीकडे राज्यात दरवर्षी दोन लाख मुले अन्नाविना मरतात आणि दुसर्यान बाजूला दुध फेकून दिले जाते. राज्यातील शेतकरी तडफडत आहे. आयुष्यात काही जमत नाही असे लोक राजकारणात घुसतात. येथे सगळे फुकटच. मग खाबुगिरी सुरू होते. येईल ते ओरबाडत बसतात. बायका-पोरं, पुढच्या पिढय़ांचही बघतात. अशानेच महाराष्ट्र खड्डय़ात गेला, असे राज म्हणाले. यावेळी मनसेच्यावतीने निवडणूक लढवणाऱयांची परीक्षा घेतली जात असल्याचे सर्मथन ठाकरे यांनी केले.
दरम्यान, आर. आर. पाटील यांच्यावर राज ठाकरे यांनी टीका केली. प्रत्येक ठिकाणी ज्यांना काही माहिती नाही अशी माणसं भरून ठेवल्यानेच महाराष्ट्राचा विचका झाला आहे. पोलीस व्हायला परीक्षा द्यावी लागते. छाती मोजतात. हाईट मोजतात. त्या आर. आर. पाटलांची हाईट कोण मोजणार, या शब्दात राज ठाकरे यांनी खिल्ली उडवली. साधे क्लर्क व्हायलासुद्धा परीक्षा द्यावी लागते. पण पंतप्रधानांची परीक्षा होत नाही. प्रामाणिकपणे काम करणार त्यांची हाईट मोजता. बाकीच्यांचे काय, असा राज यांनी प्रश्न उपस्थित केला. आपले हे महापालिका निवडणुकीचे भाषण नाही. जेव्हा बोलायचे तेव्हा संबंधितांची वस्तार्‍याने करीन. सध्या धार लावतो आहे, असे ते म्हणाले.

First Published: Monday, November 21, 2011, 03:05


comments powered by Disqus