मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर केला घोटाळा उघड - Marathi News 24taas.com

मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर केला घोटाळा उघड

www.24taas.com, सांगली
 
सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यात रोहयो योजनेतला गैरकारभार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे गृहमंत्री आर.आर.पाटील आणि ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनीच मुख्यमंत्र्यांपुढे प्रशासनाच्या गैरकारभाराचा पाढा वाचला आहे.
 
खुद्द मुख्यमंत्र्यांसमोर गृहमंत्री आर.आर.पाटील आणि ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी प्रशासनाची पोलखोल केली आहे. सांगलीतल्या आटपाडी तालुक्यात शेटफळ गावामधल्या 'रोहयो'तील कारभाराचा त्यांनी बुरखा फाडला आहे. दोघांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना मजुरांची भंबेरी उडाली. या योजनेसाठी काम करणारे मजुर बोगस आणि त्यांची जॉबकार्ड रिकामीच असल्याचं आढळून आलं आहे.
 
यावेळी मुख्यमंत्र्यांपुढेच दोन्ही मंत्र्यांनी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना खडसावलं आहे. ठेकेदारांनी मित्र, पाहुण्यांचे जॉबकार्ड बनवून कामावर आणल्याचंही उघड झालं आहे. याची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
 
ग्रामीण भागात रोजगार मिळावा यासाठी सरकारनं रोहयो योजना सुरु केली. मात्र दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यासमोर प्रशासनाच्या गैरकारभाराची दोन मंत्र्यांनीच पोलखोल केली आहे.
 
 
 

First Published: Monday, April 9, 2012, 15:02


comments powered by Disqus