Last Updated: Friday, April 20, 2012, 12:27
www.24taas.com, सातारा 
सातारा जिल्ह्यात माण खटाव तालुक्यात दुष्काळानं लहान मुलंही होरपळत आहेत. सकाळी उठल्यावर मुलांचा पहिला धडा असतो तो पाणी भरण्याचा. याचा परिणाम अभ्यासाबरोबरच आरोग्यावरही होतोय. जीव कासावीस करणाऱ्या दुष्काळग्रस्त भागातल्या मुलांचं वास्तव आहे. शाळांच्या गणवेशात असलेले विद्यार्थी. आणि त्यांच्या हातात दप्तराऐवजी डोक्यावर असलेले हंडे असतात. सातारा जिल्ह्यात दुष्काळग्रस्त गावात सर्रास हेच पहायला मिळतं.
विद्यार्थ्यांचा पहिला वर्ग सुरु होतो तो विहिरीवर किंवा एखाद्या हातपंपावर. घरात पाण्याचा काही खेपा केल्यानंतरच त्यांना शाळेत जाण्यास परवानगी मिळते. पाण्यासाठी कधी मैलोनमैल वणवण करावी लागते. तर कधी जीव धोक्यात घालून खोल विहिरीत उतरावंही लागतं. तासनतास चालणाऱ्या कसरतीचा त्यांच्या अभ्यासावर तर परिणाम होतोच आहे, तसचं दूषित पाणी पिऊन त्यांचं आरोग्य बिघडवण्यासही कारणीभूत ठरतं आहे. मुलं, मली असा फरक या कष्टातं नाही. शाळेत गेल्यावरही पाणी भरण्यापासून मुलांची सुटका नसते. माण गावातल्या काळेगावडीत जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलांना असं पाणी भरावं लागत आहे.
शाळेत पिण्यासाठी पाणी भांड्यात भरुन ठेवण्यात येते. शिक्षकांना याचं कारण विचारलं तर त्यांचं कारण आहे माध्यान्न भोजन. परीक्षा संपल्या तरी विद्यार्थ्यांना सुट्टी मिळणारच नाही. आणि मामाच्या गावालाही जाता येणार नाही. कारण मामाच्या गावातही हीच परिस्थिती असण्याची शक्यता अधिक आहे. आणि शाळेला सुट्टी असली तरी माध्यान्न भोजनासाठी त्यांना शाळेत यावचं लागणार आहे. दुष्काळात पाण्याच्या अभ्यासानं लहानग्यांची सुट्टीच हिरावून घेतली आहे.
First Published: Friday, April 20, 2012, 12:27