देवाशी लग्न नको ग बाई... - Marathi News 24taas.com

देवाशी लग्न नको ग बाई...

www.24taas.com,  श्रीगोंदा
 
तिची कहाणी. ती आजारी पडते. आजार काही बरा होत नाही. श्रद्धेपोटी नवस केला जातो, मुलीला बरं कर म्हणून. मुलीचे लग्न लावून देऊ, असं देवालाचं आमिष दाखवलं जातं. ती आजारातून मुक्त होते आणि तिच्या लग्नाची तयारी सुरू होते. मात्र, देवाशी लग्न कसे लावायचे, असा तिला प्रश्न पडतो. देवाशी लग्न नको ग बाई...अशी तिची धारणा असते. ही काही कथा नाही, प्रत्यक्ष  घडलेली घटना आहे. पिंपळगाव पिसा ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर या गावातील.
 


वय वर्षे १७. नाव सोनाली औंधकर. सोनाली नाशिककर तमाशा फडातील प्रमुख नृत्यांगना. फडाचा कणा असलेली सोनाली गेल्या वर्षी पोटदुखीने त्रस्त झाली. अनेक उपचार होऊनही गुण न आल्याने तिला ‘बाहेरची बाधा’ झाल्याचे सर्वाना वाटले. बरं होण्यासाठई तिच्या आत्याने जेजुरीच्या खंडोबाला नवस केला, ‘की सोनालीची पोटदुखी बरी झाली, तर तिचे तुझ्याशी लगीन लावेन.’
 
 
सोनालीला खंडोबाशी लगीन करण्याचा नवस मान्य नव्हता, पण आत्याने तिच्या आईच्या वैद्यकीय उपचारांसाठी मोठी आर्थिक मदत केल्याने ती तिच्या उपकारांच्या ओझ्याखाली होती. त्यामुळे या दबावासाठी तिला लग्नाला होकार द्यावा लागला. नवस बोलल्याचे वर्ष ८ मे रोजी म्हणजे मंगळवारी संपणार होते. ही बाब नाशिकचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी नाशिक व नगर जिल्ह्य़ात फडाचा कसून शोध घेतला.  शोध घेण्यासाठई मोबाइल ट्रॅकरही वापरला.पिंपळगाव पिसा , जि. अहमदनगर येथे सोनालीचा तमाशा होणार असल्याची माहिती मिळाली. तेव्हा चांदगुडे, कमलेश गायकवाड, प्रा. आनंद गोरे, प्रा. प्रकाश साळवे आदी कार्यकर्त्यांनी पोलिसांना घेऊन फड गाठला.
 
 
देवाशी लग्न लावण्याची प्रथा १९३४ पासून ब्रिटिशांनी केलेल्या कायद्याप्रमाणे बेकायदा आहे. राज्य सरकारनेही त्याबाबत कायदा केला आहे. या लग्नामुळे मुलीचे जीवन उद्ध्वस्त होईल, याची जाणीव कार्यकर्त्यांनी सर्वाना करून दिली. सोनालीला लग्न करायचे नव्हते व चारचौघींप्रमाणे जीवन जगायचे होते. मात्र देवाला दिलेला शब्द मोडला तर सोनालीला त्रास होईल, अशी आत्याला भीती वाटत होती. त्यामुळे लग्नाचा घाट घातला गेला. मात्र, अंधश्रद्धा निर्मूलन समितीमुळे हा डाव हाणून पाडला.
 
 
सोनालीच्या खर्चाची सर्व जबाबदारी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घेतली. तिच्या खऱ्या लग्नासाठी २५ हजार रुपयांची मदत जाहीर केली. सोनालीचे वडील कराड येथील आगाशीव झोपडपट्टीत राहतात. ते वाहनचालक असून व्यसनी आहेत व तिला तीन धाकटी भावंडे आहेत. वडिलांना व्यसनमुक्त करण्याची जबाबदारीही समितीने घेतली आहे, अशी माहिती कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांनी दिली.

First Published: Tuesday, May 8, 2012, 11:24


comments powered by Disqus