Last Updated: Sunday, September 16, 2012, 09:28
www.24taas.com,पुणेकोळसा घोटाळा आणि त्यानंतर एफडीआयच्या निर्णयानं काँग्रेसला विरोधकांनी घेरलं असताना केंद्रीय गृहमंत्री सुशीलकमुरा शिंदे यांनी मात्र वादग्रस्त विधान करुन पक्षाला अडचणीत आणलंय. लोक बोफोर्स विसरले, कोळसा घोटाळाही विसरतील, असं संतापजनक वक्तव्य शिंदे यांनी पुण्यात केलं.
कोळशाने थोडे दिवस हात काळे होतात पण एकदा हात धुतले की हात परत स्वच्छ होतात असं बेजबाबदार मत व्यक्त केलं. धक्कादायक बाब म्हणजे संसेदेपासून गल्लीपर्यंत कोळसा घोटाळ्यावरुन रणकंदन सुरु असताना केंद्रीय गृहमंत्रिपदावर असलेल्या सुशीलकुमार शिंदेंनी बेजबाबदार वक्तव्य करुन हशा आणि टाळ्या मिळवल्यात. सुशीलकुमार शिंदेंना कॅगने खाणवाटपावर मारलेल्या ताशे-यांचे गांर्भिर्य राहिले नाही का असा सवाल आता उपस्थित केला जातोय.
कोळशामुळे हात थोडे काळे होतात हे खरे, पण धुतले की पुन्हा स्वच्छ होतात, हेही खरे, अशी जोड देतानाच रालोआ सरकारमधील पेट्रोल पंप वाटप प्रकरणही आता लोकांच्या विस्मरणात गेले आहे, अशी पुस्तीही शिंदे यांनी जोडली. कोळशाच्या कथित प्रकरणामुळे संसदेचे कामकाज होऊ शकले नाही. असे सांगून ते म्हणाले मध्यावधी निवडणुकांची कोणतीही शक्यता नाही. कोळसावाटप मुद्दा चर्चेतूनच सुटू शकेल. शिवाय संसदेत कामकाज न होण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हे. यापूर्वीही असे घडले आहे. कुणीतरी आपल्या प्रतिष्ठेचे प्रश्न केल्याने असे घडते. संसदेच्या अधिवेशनाचे दोन महिने बाकी आहेत. त्यामुळे मार्ग निघेल अशी आशा आहे.
देशाची सध्याची आर्थिक अवस्था पाहता थेट परकीय गुंतवणुकीचा निर्णय गरजेचा होता, अशा शब्दांत शिंदे यांनी सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले. केरोसीन, गॅस, पेट्रोलच्या किमतींना हात न लावता केवळ डिझेलच्या किमतीत वाढ केली आहे. अन्यथा १९९१मधील वेळ पुन्हा आली असती. तीच अवस्था पुन्हा स्वीकारायची की मार्ग काढायचा, हा प्रश्न असल्याने योग्य तोच निर्णय घेतला आहे. यामुळे सर्वांनाच थोडा त्रास होणार आहे. जनतेने घाबरून जाऊ नये. किमती पुन्हा खाली येऊ शकतील. यूपीएतील घटक पक्षांना व्यवस्थित समजावले तर त्यांचाही विरोध मावळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
First Published: Sunday, September 16, 2012, 09:28