दाभोलकर हत्या प्रकरणात पोलिसांची भूमिका काय?, whats pune police doing in dabholkar murder case

दाभोलकर हत्या प्रकरणात पोलिसांची भूमिका काय?

दाभोलकर हत्या प्रकरणात पोलिसांची भूमिका काय?

www.24taas.com, झी मीडिया, पुणे

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयितांची जामिनावर सुटका झालीय. मात्र, या घटनेनं या प्रकरणाच्या पोलीस तपासाबाबतचा संशय अधिकच बळावलाय. आरोपी जामिनावर सुटणं हे जितकं वेदनादायी आहे, तितकच संतापजनकही आहे. पोलिसांच्या अकार्यक्षमतेचे वाभाडे यानिमित्तानं निघाले आहेत

तारीख  २० ऑगस्ट २०१३ - डॉ.  नरेंद्र दाभोलकरांची पुण्यात गोळ्या घालून हत्या
तारीख २० जानेवारी २०१४ - डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी मनीष नागोरी आणि 
विकास खंडेलवाल  यांना अटक 
तारीख २१ एप्रिल २०१४ - डॉ. आरोपी नागोरी आणि खंडेलवाल यांना जामीन मंजूर 
 
या घटनाक्रमावर नजर टाकली तर `काय चाललाय तरी काय?` असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. ज्यांच्या हातात सर्वसामान्य माणसाची सुरक्षा आहे, असं मानलं जातं ते आमचे पोलीस दाभोलकरांना वाचवू शकले नाहीत. त्यानंतर सुरु झालं तपासनाट्य… धागेदोरे मिळालेत, आरोपींना शोधल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, वगैरे वगैरे…

दाभोलकरांचे मारेकरी पकडण्यासाठी सामाजिक तसेच राजकीय दबाव वाढत असतानाच, हत्या होऊन बरोब्बर ५ महिने झाल्याच्या दिवशी नागोरी आणि खंडेलवाल पोलिसांच्या हाती लागले. अवैध शस्त्र  विक्रीच्या धंद्यात सक्रिय असलेल्या या दोघांच्या पिस्तुलातून दाभोलकरांची हत्या करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आणि अखेर फलीत काय, तर तीन महिने ताब्यात ठेवूनही पोलीस आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करू शकले नाहीत. दोघांवर आरोप ठेवण्याइतपतही पुरावे पोलीस गोळा करू शकले नाहीत. त्यामुळेच नागोरी आणि खंडेलवालला जामीन  मंजूर करतानाच न्यायालयाने पोलिसांना कारणे द्या नोटीस बजावली आहे, असं आरोपींचे वकील ए. बी. अलूर यांनी म्हटलंय.

दरम्यान, पोलिसांची या प्रकरणात सर्वात महत्त्वाची भूमिका आहे. मात्र, अप्पर पोलीस आयुक्त शहाजी सोळंकेही आता या विषयावर बोलायला तयार नाहीत.

डॉ. दाभोलकरांची हत्या झाल्यानंतर तब्बल ८ महिन्यानंतरची ही स्थिती आहे. दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपासच खऱ्या अर्थाने हरवला आहे. सुरुवातीपासून पोलिसांवर विश्वास ठेवून असलेल्या दाभोलकर कुटुंबीयांसाठी ही गोष्ट अतिशय वेदनादायी आहे, असं हमीद आणि मुक्ता दाभोळकर सांगतात.

दाभोलकरांच्या हत्येची कबुली देण्यासाठी `एटीएस`नं ५० लाखांची ऑफर दिल्याचा खळबळजनक  आरोप मनीष नागोरीने भर कोर्टात केला होता. नंतर तो नाट्यमयरीत्या मागे घेण्यात आला. या संदर्भातील तथ्य काय असेल ते असो… मात्र, सुरुवातीपासून जे काही घडत गेलं  ते संशयाला पुष्टी देणार आहे. हा पोलीस तपासाचा निव्वळ फार्स आहे, इथपर्यंतच्या प्रतिक्रिया सर्वसामान्यांकडून येत असतील तर त्यापेक्षा मोठी नामुष्की नाही. पोलीस खातंच जणूकाही अंधश्रद्धा बनलंय, यापेक्षा मोठे दु:ख ते काय…?





इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, April 23, 2014, 10:04


comments powered by Disqus