न्यायालयाचा अवमान केलेला नाही - राज, I was not contempt of court - Raj Thackeray

न्यायालयाचा अवमान केलेला नाही - राज

 न्यायालयाचा अवमान केलेला नाही - राज
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मी न्यायालयाचा अवमान होईल असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. माझे मत न्यायमूर्तींच्या विरोधात नव्हते, असे प्रतिज्ञापत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उच्च न्यायालयात सादर केले आहे.

शिवाजी पार्क मैदानावर महापालिका निवडणुकीच्या प्रचार सभेस परवानगी नाकारल्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन टीका केली. त्यामुळे राज यांच्याकडून न्यायालयाचा अवमान झाला आहे. त्यांच्यावर न्यायालयाचा अवमान झाल्याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी करणारी याचिका अॅड. एजाज नख्वी यांनी दाखल केलेय. त्यावर राज यांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.

शिवाजी पार्कवर सभेला परवानगी नाकारल्यानंतर मी मराठी भाषेतून पत्रकार परिषद घेतली. त्यामुळे इंग्रजी आणि इतर भाषेतील वार्ताहरांनी त्यांच्या सोयीनुसार माझ्या वक्तव्याचा अर्थ लावला गेला. तसे वृत्त प्रसारित केले. शिवाजी पार्क मैदान शांतता क्षेत्र असल्याने दसरा रॅली आयोजित करण्यासाठी शिवसेनाही न्यायालयात अर्ज करते. या अर्जाला राज्य शासन विरोध करीत नाही. मग माझ्या प्रसारसभेला राज्य शासनाने विरोध का केला? हा पक्षपातीपणा असून, यावर भाष्य करणे म्हणजे न्यायालयाचा अवमान नव्हे, असे राज यांनी म्हटले आहे.

न्यायालयाने परवानगी नाकारल्यानंतर त्या आदेशाची प्रत आम्हाला तत्काळ मिळाली नाही. ही प्रत पाच दिवसांनी उपलब्ध झाली. त्यामुळे या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता आले नाही, असे मी म्हटले होते. न्यायालयाने मला सर्वोच्च न्यायालयात जाण्यापासून रोखले असे मी म्हटले नव्हते, असे स्पष्टीकरण राज यांनी प्रतिज्ञापत्रात दिले आहे. मी न्यायालयाचा अवमान होईल असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. त्यामुळे न्यायालयाने माझ्याविरोधातील याचिका फेटाळून लावावी, अशी मागणी राज यांनी या प्रतिज्ञापत्राद्वारे केली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, July 16, 2013, 16:39


comments powered by Disqus