Last Updated: Thursday, October 10, 2013, 17:54
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईआज सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. गेली २३ वर्षं सचिन तेंडुलकरने क्रिकेट मैदानावर क्रिकेटप्रेमींच्या डोळ्यंचं पारणं फेडलं. त्याच्या कारकीर्दीतले टॉप १० क्षण-
१- २ एप्रिल, २०११ (विश्वचषक विजय)
“मी यापेक्षा चांगलं काहीच मागू शकत नाही. मला वाटतं, विश्वचषक जिंकणं ही सर्वांत मोठी घटना आहे आणि या घटनेचा मी साक्षीदार आहे.” अशा शब्दांत खुद्द सचिननेच आपल्या कारकीर्दीतील हा क्षण सर्वोत्कृष्ट असल्याचं म्हटलं होतं. विश्वचषक स्पर्धेत स्वतः सचिननेही ९ मॅचेसमध्ये ४८२ धावा काढल्या होत्या. इंग्लंडविरुद्ध त्याने केलेल्या १२० धावा या विश्वचषक स्पर्धेतील त्याच्या सर्वाधिक धावा होत्या. विश्वचषक जिंकणं हे सचिन तेंडुलकरचं पहिल्यापासून स्वप्न होतं. ते २०११ साली पूर्ण झालं.
२- १६ मार्च, २०१२ (एकदिवसीय सामन्यांमध्ये १०० वं शतक)
समस्त क्रिकेटप्रेमी आणि विशेषतः सचिनच्या चाहत्यांना प्रतिक्षा होती ती म्हणजे सचिनच्या एकदिवसीय सामन्यांमधील शंभराव्या शतकाची. अशिया कपमध्ये सचिन तेंडुलकरला अकरावा खेळाडू निवडल्याबद्दल अनेकांनी टीका केली होती. अशिया कपमधील सचिनची कामगिरी त्याला साजेशी नसल्याचं टीकाकारांचं म्हणणं होतं. मात्र सचिनने याच सामन्यांमध्ये बांग्लादेशाविरोधात शतक झळकावत आपलं शंभरावं शतक साजरं केलं.
३- ब्रॅडमॅनच्या स्वप्नातील ११ पैकी
“जेव्हा सर डॉन ब्रॅडमन यांनी आपली सर्वकालीन कसोटीतील ११ खेळाडूंची यादी घोषित केली आणि त्यात मीझंही नाव होतं, तेव्हा ते माझ्यासाठी माझं सर्वांत मोठं कौतुक होतं”असं सचिन म्हणाला. जेव्हा टीव्हीवर सचिन तेंडुलकरला खेळताना सर डॉन ब्रॅडमन यांनी पाहिलं, तेव्हा आपल्या पत्नीला बोलावून घेतलं आणि म्हटलं, की याला पाहून मला माझीच आठवण येते. ब्रायन लारा आणि व्हिव्हियन रिचर्ड्ससारख्या अनेक उत्तम खेळाडूंच्या वर सर डॉन ब्रॅडमन यांनी सचिनचा क्रमांक लावला.
४- १ मार्च, २००३, पाकिस्तान विरुद्ध ९८ रन्स
विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान भारताला कधीच हरवू शकलं नाही. आणि हा विक्रम अबाधित रहावा याची सचिनने पुरपूर काळजी घेतली. २००३ साली विश्वचषक स्पर्धेत विरेंद्र सेहवागसोबत खेळायला उतरलेल्या सचिनने आपल्या आयुष्यातील एक सर्वोत्तम खेळी केली. ही मॅच खरंतर शोएब आख्तर आणि सचिन तेंडुलकर यांच्यातील युद्ध म्हणूनच पाहाण्यात येत होतं. मात्र या युद्धात सचिनने शोएब अख्तरचा धुव्वा उडवला. पायाला दुखापत होऊनही सचिनने ९८ धावा काढल्या. सचिन तेंडुलकरचं या सामन्यात शतक हुकलं असलं, तरी सचिन तेंडुलकरने केलेला आक्रमक खेळ आजही स्रवांच्या लक्षात आहे.
५- २४ फेब्रुवारी, द. आफ्रिका विरुद्ध २०० धावा
एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये २०० धावा करणारा सचिन तेंडुलकर हा पहिला पुरूष खेळाडू ठरला. केवळ १४७ बॉल्समध्ये सचिन तेंडुलकरने धावा केल्या होत्या. या सामन्यात त्याने २५ चौकार आणि ३ षटकार ठोकले होते. ५० ओव्हर्समध्ये भारताचा स्कोअर ४०१ धावांचा झाला होता. हा सामना भारत १५३ धावांनी जिंकला होता. सचिनपूर्वी पाकिस्तानच्या सईद अन्वरने १९९७ साली भारताविरुद्ध १९४ धावांचा विक्रम केला होता. हा विक्रम सचिन तेंडुलकरने मोडीत काढला.
६- २३ मे, १९९९ (वडिलांना अर्पण केलेलं शतक)
सचिनचे आपल्या वडिलांबद्दल उद्गार होते, “माझे वडील हे माझे हिरो आहेत. कारण माझ्या आयुष्याची सुरूवात त्यांच्यापासूनच होते. मी नेहमी त्यांच्याच मार्गावर चालतो.” सचिनचे वडील रमेश तेंडुलकर हे सचिनचं दैवत होते. जेव्हा मालिकेमध्ये भारताला केन्याविरुद्ध सामना जिंकणं अत्यावश्यक होतं, त्यावेळी सचिन भारतात आपल्या वडिलांचे अंत्यसंस्कार पूर्ण करून परतला. त्यानंतर केन्याविरुद्ध सामन्यात सचिनने १४० धावा काढल्या. राहुल द्रविडसोबतच्या भागीदारीत राहुल द्रविडने नॉट आऊट १०४ धावा काढल्या. सचिन तेंडुलकरने जेव्हा हे शतक पूर्ण केलं, तेव्हा त्याने नेहमीप्रमाणे आपलं हेल्मेट काढलं आणि आकाशाकडे पाहात देवाचे आणि वडिलांचे आभार मानले. बॅट आकाशाकडे करत सचिनने आपलं शतक आपल्या वडिलांना अर्पण केलं.
७- शारजामधील धडाकेबाज सामने
२२ एप्रिल १९९८- शारजामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध काढलेल्या १४३ धावा
महत्वाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली. मायकल बेव्हेनने १०१ धावांची धणदणीत खेळी केली होती. ५० ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाने २८४ धावा केल्या होत्या. फायनलमध्ये पोहोचण्यासाठी सचिनला २८५ धावा करणं आवश्यक होतं. वादळ आल्यामुळे चार ओव्हर कमी करण्यात आल्या आणि २७६ धावांऐवजी २३७ धावा करण्याचे ठरले. सचिनने यावेळी आपल्या एकदिवसीय सामन्यांमधला तोपर्यंतचा सर्वाधिक स्कोअर केला. १३१ बॉल्समध्ये सचिनने १४३ धावा काढल्या. भारताला २५ धावांची गरज असताना सचिन बाद झाला होता. मात्र त्याने भारताला फायनलमध्ये पोहोचवलं होतं.
२४ एप्रिल, १९९८- शारजामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १३४ धावा
तेंडुलकरने आपल्या वाढदिवसाला देशाला चांगलीच मेजवानी दिली. दोनच दिवसांपूर्वी सचिनने आपल्या कारकीर्दीतील एक सर्वोत्तम खेळी केली होती. मात्र भारत जिंकू शकला नव्हता. पण पुढच्या सामन्यात सचिनने एकहाती सामना जिंकवून देण्याचा निर्धार केला. स्टीव वॉने नाणेफेक जिंकून बॅटिंग घेतली होती. भारतापुढे २७२ धावांचं लक्ष्य असताना सचिनने जोरदार खेळत आपला २५ वा वाढदिवस साजरा केला आणि भारताला जिंकवून दिलं. या मॅचनंतर एका मुलाखतीत शेन वॉर्नने कबुल केलं होतं, की आपल्याला रात्री स्वप्नांत सचिन तेंडुलकर दिसतो आणि त्याचा खेळ घाबरवतो.
८- ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रेक्षणीय खेळी
मार्च ०२, २००८- ऑस्ट्रेलिया विरुद्ध नॉट आऊट ११७, सिडनी
दहा वर्षांपूर्वी, सचिनने शारजात ऑसी खेळाडूंना पाणी पाजलं होतं. यावेळी त्याने वाघाला त्याच्याच गुहे हरवण्याचं साहस केलं. या सामन्यामध्ये शतक न झळकवताही सचिनने सर्वोत्कृष्ट भागीदारी करत सिडनी दणाणून सोडली.
९- ३१ जानेवारी १९९९, पाकिस्तान वि, १३६ धावा, चेन्नई
कसोटी क्रिकेटमधील एक सर्वोत्तम खेळत सचिनने चेन्नईत आपणच मास्टर असल्याचं दाखवून दिलं. दडपणाखाली खेळत असूनही भारताने आपल्या जुन्या शत्रूंचा चांगलाच वचपा काढला. तेंडुलकरला पाठदुखीच्या त्रासामुळे खेळणं शक्य होत नव्हतं. तरीही सचिनने भागीदारीत चांगला खेळ करून सर्वांची मनं जिंकली. सचिनला सकलेन मुश्ताकने बाद केल्यावर पुढील भारतीय खेळाडू जेमतेम चार-चार धावा काढून बाद झाले. त्यामुळे पाकिस्तानने हा अटीतटीचा सामना १२ धावांनी जिंकला. कडक सुरक्षेत सुरू असलेल्या या सामन्यात पाकिस्तानने विजय प्राप्त केला. तरीही सचिनने सर्वांचं मन जिंकलं.
१०- १९९३, हिरो कप सेमी-फायनल- तेंडुलकरची द. आफ्रिकेविरुद्धची जादुई ओव्हर
सचिन तेंडुलकर बॅटिंगसाठी जास्त प्रसिद्ध असला, तरी काहीवेळा त्याने आपल्या बॉलिंगची करामतही दाखवून दिली आहे. जेव्हा द. आफ्रिकेला जिंकण्यासाठी ६ बॉलमद्ये ६ धावांची निकड होती, तेव्हा बऱ्याच चर्चेनंतर सचिन तेंडुलकरला शेवटची ओव्हर देण्यात आली. सचिनची ती पहिलीच ओव्हर होती. मात्र सचिनच्या बॉलिंगपुढे द. आफ्रिकेला ६ धावा करणंही अशक्य झालं. द. आफ्रिकेचा २ धावांनी पराभव झाला.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, October 10, 2013, 17:50