सचिनच्या शतकांपैकी अव्वल दहा शतकं,Sachin`s memorable 10 Centuries

सचिनच्या शतकांपैकी अव्वल दहा शतकं

सचिनच्या शतकांपैकी अव्वल दहा शतकं
www.24taas.com, झी मीडिया मुंबई

सचिन तेंडुलकरच्या शतकांपैकी अव्वल दहा शतकांची निवड करणे तसे अवघडच. पण त्याच्यासारखा चँपियन फलंदाज प्रतिकुल परिस्थितीत एखादे शतक झळकावतो, तेव्हा त्याचे मोल अधिक असते. सचिनच्या दहा सर्वोत्तम शतकी खेळींच्या स्मृतींना उजाळा देण्याचा 24तासचा एक प्रयत्न. अर्थात ही निवड सर्वोत्तम असल्याचा दावा नाही.

सचिनने भारतीय भूमीवर जितकी शतके झळकावली आहेत, जवळपास तितकीच शतके परदेशी मैदानांवर झळकावली आहेत. त्यातही विशेष म्हणजे त्याच्या कारकीर्दीचे पहिले शतक किंवा पहिले अर्धशतक हे झाले परदेशी मैदानावरच. सचिनच्या दहा सर्वोत्तम शतकी खेळींवर एक दृष्टिक्षेप.

१. ११९ नाबाद, ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर (वि. इंग्लंड) १९९० : वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी सचिन इंग्लंडमध्ये खेळत होता, त्यावेळी त्याचा उल्लेख तेथे ‘स्कूलकिड’ असा केला गेला. ओल्ड ट्रॅफर्डवरील त्या कसोटी सामन्यात भारतासमोर विजयासाठी लक्ष्य होते ४०८ धावांचे. आणि परिस्थिती ६ बाद १८३ अशी झाल्यानंतर सामना वाचवणे हेच मुख्य उद्दिष्ट बनून गेले. सचिनवर सामना वाचवण्याची जबाबदारी मोठी होती. सर्व प्रमुख फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते आणि जोडीला होता मनोज प्रभाकर. या खडतर परिस्थितीतही सचिनने मनमोकळी आणि आक्रमक फलंदाजी केली. न भिता नैसर्गिक खेळ कसा करायचा, याचा धडा त्या दिवशी सचिन तेंडुलकरने घालून दिला. इंग्लिश कर्णधार ग्रॅहॅम गूचला नाइलाजाने बचावात्मक क्षेत्ररचना लावावी लागली. सचिनने याचा पुरेपूर फायदा घेतला, प्रभाकरबरोबर नाबाद १६० धावांची भागीदारी करून सामना वाचला. एका सुपरस्टार फलंदाजाची पहिली झलक क्रिकेटजगताला पाहायला मिळाली.

२.१११, जोहान्सबर्ग (वि. दक्षिण आफ्रिका) १९९२ : भारताचा तो ऐतिहासिक दौरा होता. जोहान्सबर्ग कसोटीत अॅलन डोनाल्ड, ब्रायन मॅकमिलन, क्रेग मॅथ्यूज या गोलंदाजांसमोर भारताची ४ बाद ७७ अशी अवस्था झालेली. सचिनला तळाच्या फलंदाजांना हाताशी धरून दक्षिण आफ्रिकेचा मुकाबला करावा लागला. पण त्याचा अॅप्रोच बदलला नाही. सचिन त्याच्या नेहमीच्या शैलीत आक्रमकपणे खेळला. सचिनची ती खेळी दक्षिण आफ्रिकेच्या प्रेक्षकांनाही आवडली.

३.११४, पर्थ (वि. ऑस्ट्रेलिया) १९९२ : जगातील सर्वाधिक वेगवान खेळपट्टी असा पर्थमधील ‘वाका’ मैदानावरील खेळपट्टीचा लौकीक आजही आहे. साधारण वीसेक वर्षापूर्वी तिचा उल्लेख ‘बॅट्समेन्स ग्रेव्हयार्ड’ असा व्हायचा. त्या खेळपट्टीवर प्रचंड बाउन्स आणि वेगही होता. क्रेग मॅकडरमॉट, मर्व ह्यूज, पॉल रायफेल आणि माइक व्हिटनी हे चार गोलंदाज या खेळपट्टीवर आग ओकत होते. सचिनचा पहिलाच ऑस्ट्रेलिया दौरा आणि पर्थचा पहिलाच सामना होता. जबरदस्त बाउन्सचा मुकाबला त्याने बॅकफुटवर खेळून व्यवस्थित केला. एकदा टप्प्याचे भान आल्यानंतर सचिनने कट आणि पुलच्या फटक्यांद्वारे ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर प्रतिहल्ला चढवला. ऑस्ट्रेलियन गोलंदाज, प्रेक्षक, समालोचकांसाठी हा सर्वस्वी नवीन अनुभव होता. आजवर बहुतेक फलंदाजांनी या मैदानावर शरणागती पत्करलेली त्यांनी पाहिली होती. पण १९ वर्षाचा एक फलंदाज बेधडकपणे ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या चिंधड्या उडवत होता. सचिनच्या नावासमोर ११४ धावा लागल्यानंतर ते तुफान थंडावले. आज खुद्द सचिन, तसेच कित्येक क्रिकेटतज्ज्ञांच्या नजरेतून ती कसोटी क्रिकेटमधील एक सर्वोत्तम खेळी गणली जाते.

४. १६९, केपटाऊन (वि. दक्षिण आफ्रिका) १९९६ : अॅलन डोनाल्ड, शॉन पोलॉक, ब्रायन मॅकमिलन, लान्स क्लूज़्नळर यांच्या मा-यासमोर भारताची अवस्था ५ बाद ५८ अशी गंभीर, अशा परिस्थितीत मोहंमद अझरुद्दीन आणि तेंडुलकर या दोघांनी हल्ला चढवून फक्त दोन सत्रांमध्ये २२२ धावांची भागीदारी केली. सचिनच्या १६९ धावांच्या खेळीत २६ चौकार होते. डोनाल्डनेही त्या खेळीचे कौतुक केले. प्रेक्षकांनी उभे राहून त्या खेळीला दाद दिली.

५. १५५ नाबाद, चेन्नई (वि. ऑस्ट्रेलिया) १९९८ : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ती एकमेव कसोटी होती. पण चेन्नईच्या टर्निग विकेटवर मुकाबला शेन वॉर्नशी होता. पहिल्या डावात पिछाडीनंतर भारताला सुरक्षित स्थितीत नेणे ही प्राथमिकता होती. वॉर्न लेगस्टंपच्या लाइनबाहेर चेंडू टाकत होता आणि त्या ठिकाणी बुटांमुळे पडलेल्या खड्डय़ांचा वापर करून चेंडू उसळवत होता. सचिनने स्लॉगस्वीप फटक्याचा वापर करून वॉर्नला त्याचाच खड्डयांत टाकले. भारताला भक्कम आणि विजयी आघाडी मिळवून दिली. सचिनच्या त्या तडाख्यानंतर वॉर्न भारतात किंवा भारताविरुद्ध कोठेही डोके वर काढू शकला नाही.

६. १३६, चेन्नई (वि. पाकिस्तान) १९९९ : सचिनच्या दृष्टीने या खेळीचे मोल आजही खूप आहे. पण ही खेळी भारताला पाकिस्तानविरुद्ध विजयी करू शकली नाही, याची रुखरुख त्याला आजही वाटते. चेन्नईच्या ठिसूळ खेळपट्टीवर साकलेन मुश्ताक, शाहीद आफ्रिदी आणि नदीम खान यांच्या फिरकीसमोर २७१ धावांचे लक्ष्य होते. तशात भारताची अवस्था ५ बाद ८२ अशी झाल्यानंतर उरल्यासुरल्या आशाही संपुष्टात आल्या होत्या. पण सचिनने नयन मोंगियाच्या साथीने भारताचा डाव सावरला आणि मग विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली. सचिनसमोर दोन आव्हाने होती. पाकिस्तानची गोलंदाजी आणि त्याची दुखरी पाठ. वेदनांवर मात करत त्याने शतक झळकावले. पण विजयाच्या समीप आल्यानंतर साकलेनच्या एका ‘दूसऱ्या’वर सचिन चकला नि बाद झाला. तो बाद झाल्यानंतर पाकिस्तानसमोर भारताचे शेपूट टिकू शकले नाही आणि अवघ्या १२ धावांनी भारत पराभूत झाला. प्रतिस्पर्धी कर्णधार वासिम अक्रमच्या मते ती त्याने पाहिलेली कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी होती.

७. १५५, ब्लोमफाँटेन (वि. दक्षिण आफ्रिका) २००१ : भारताची बिकट अवस्था ४ बाद ६८. सचिनवर एक मोठी जबाबदारी. त्याने खाते खोलण्यास १७ चेंडू घेतले. पण नंतरच्या १०१ धावा ९७ चेंडूंमध्ये ठोकल्या. पहिल्या डावात त्या खेळीने भारताला सुस्थितीत आणून सोडले

८. १९३, लीड्स (वि. इंग्लंड) २००२ : भारत त्या मालिकेत ०-१ असा पिछाडीवर पडला होता. पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारून इंग्लंडवर दबाव आणण्याची गरज होती. सचिनने राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांच्या साथीने शतकी भागीदा-या रचल्या. भारताच्या १८५ धावा झाल्या त्यावेळी सचिन खेळायला आला होता. तो परतला त्यावेळी भारताच्या धावा होत्या ५९६. सचिनची फलंदाजी म्हणजे फलंदाजांसाठी शिक्षणच होते, असे गौरवोद्गार प्रतिस्पर्धी कर्णधार नासिर हुसेनने काढले.

९. २४१ नाबाद, सिडनी (वि. ऑस्ट्रेलिया) २००४ : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्या मालिकेत भारताची कामगिरी चांगली होत होती, पण सचिन चाचपडत होता. अखेर मालिकेतल्या शेवटच्या कसोटीत त्याने खेळपट्टीवर उभे राहण्याचा निर्णय घेतला. ऑफस्टंपच्या लाइनबाहेरील कोणत्याही चेंडूला स्पर्श न करण्याचा त्याचा निर्णय खरोखरच धाडसी होता. केवळ लाँगलेग ते लाँगऑन या अर्धवर्तुळात सचिनने फटके लगावले आणि शतकच नाही, तर द्विशतकही झळकावून दाखवले.

१०. १०३ नाबाद, चेन्नई (वि. इंग्लंड) २००८ : भारतात चौथ्या डावात विजयी शतकी खेळी करण्याची कामगिरी सचिनकडून २००८ पर्यंत झालेली नव्हती. चेन्नईच्या खेळपट्टीवर भारताला चौथ्या डावात माँटी पानिसार आणि ग्रॅहॅम स्वान यांच्या फिरकीसमोर ३८७ धावा जिंकण्यासाठी करायच्या होत्या. वीरेंदर सेहवागच्या स्फोटक खेळीमुळे भारताला चांगली सुरुवात करता आली. पण डाव बांधून ठेवण्याची जबाबदारी पार पाडली सचिन तेंडुलकरने. तो खेळताना कोणत्याही दडपणाखाली वाटलाच नाही. एकेरी-दुहेरी धावा पळून काढतानाच, प्रसंगी चेंडू सीमापारही धाडले. विजयी चौकार त्याचे शतकही पूर्ण करून गेला. चेन्नईच्या मैदानावर अखेरीस भारतला चौथ्या डावात जिंकून देण्याची त्याची कामना पूर्ण झाली. हे शतक मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना अर्पित करण्याचा मनाचा मोठेपणाही त्याने दाखवला.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, October 10, 2013, 19:22


comments powered by Disqus