Last Updated: Sunday, November 24, 2013, 18:19
www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली सचिन तेंडुलकर माझ्या गोलंदाजीला घाबरतो, असं विधान करणाऱ्या ‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ शोएब अख्तरला तोंडावर पाडलंय पाकिस्तानच्याच एका माजी कर्णधारानं... वसीम अक्रमनं.
काही महिन्यांपूर्वी `काँट्रव्हर्शली युवर्स` या आपल्या आत्मचरित्रात शोएबनं ‘विक्रमादित्य सचिन तेंडुलकर माझी बॉलिंग खेळताना घाबरायचा… फैसलाबादच्या संथ खेळपट्टीवर मी वेगात टाकलेले चेंडू सचिननं सोडून दिले होते. माझ्या गोलंदाजीला सामोरे जाताना तो अस्वस्थ असायचा’ अशी मुक्ताफळं उधळली होती. अर्थातच, तेव्हाही त्याचा वाईट परिणाम त्याला भोगावा लागला होता. सचिनवर शोएबनं केलेली आगपाखड पाहून जगभरातले दिग्गज क्रिकेटपटू भडकले आणि त्यानं शोएबची चांगलीच धुलाई केली होती... आणि तेव्हाही वसीम अक्रमनंही अख्तरला फैलावर घेतलं होतं.
आता, तर वसीमनं अख्तरला अक्षरश: तोंडावर पाडलंय. खोटारड्या शोएबचा खोटारडेपणा उघड करत सचिनला घाबरून एकदा शोएबनंच सचिनसमोर बॉलिंग करण्यापासून माघार घेतली होती. यासाठी त्यानं कर्णधार वसीमला तशी विनवणीही केली होती, असं वसीमनं उघड केलंय.
२००३च्या वर्ल्डकपमध्ये सचिन भलताच फॉर्मात होता. या विश्वचषकातील भारत-पाक सामन्यात कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण क्रीडाविश्वाचं लक्ष लागलेलं होतं. पाकिस्तानने पहिली फलंदाजी करीत भारतासमोर २७४ धावांचे आव्हान ठेवलं होतं. भारत आणि पाकिस्तानची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती. सचिन आणि सेहवाग यांनी अपेक्षेप्रमाणे जोरदार सुरुवात केली होती. सचिन तर पाकची गोलंदाजी अक्षरश: फोडून काढत होता. सचिनची आक्रमकता पाहून पाकिस्तानच्या टीमनं शोएबला बॉलिंगची संधी दिली. या संधीचं कदाचित तो फायदा मिळवू शकेल, असा विश्वास पाक टीमला होता. पण, सचिननं शोएबच्या पहिल्याच बॉलवर धमाकेदार सिक्सर ठोकला... त्यानंतर सचिनने पुन्हा दोन चौकारही ठोकले... आणि शोएबच्या पायाखालचं मैदानही सरकलं... आणि त्याचा आत्मविश्वासही.
शोएब लगेचच कर्णधार वसीम अक्रम आणि वकार युनूस यांच्याकडे गेला आणि `वसीम भाई मुझे इसे बोलिंग नही करनी है। क्या खेल रहा है ये।` असं म्हणत चक्क त्यानं पाक संघाच्या अपेक्षांची माती केली... असं नुकतंच वसीमनं उघड केलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, November 24, 2013, 18:19